लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशीम : शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार म्हणून खासदार भावना गवळी यांचे नाव जाहीर करावे, यासाठी गवळी समर्थकांनी मुंबईवारी केली. तरीही खासदार भावना गवळी यांचे नाव जाहीर न झाल्याने उमेदवारीचा तिढा कायम आहे. खासदार गवळी यांनाच उमेदवारी मिळणार, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यामुळे संभाव्य उमेदवार म्हणून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, यावरून मतदार संघात उत्सुकता ताणली गेली आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला, परंतु शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर विद्यमान खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या. शिवसेना ठाकरे गटाने माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. तर गेल्या पाच टर्मपासून निवडून येत असलेल्या खासदार भावना गवळी यांना उमेदवारी साठी संघर्ष करावा लागत आहे.

आणखी वाचा-ॲड. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पाठिंबा देणार? माजी आमदार म्हणतात, “धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी…”

यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे गटात उमेदवारीसाठी खासदार भावना गवळी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांचे कार्यकर्ते गोंधळात सापडल्याचे चित्र आहे. तर महाविकास आघाडीत माजी मंत्री संजय देशमुख यांच्या नावाची घोषणा होताच त्यांनी प्रचार ही सुरू केला आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सुभाष पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र महायुती कडून अद्याप उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. गुरुवारी शिवसेना शिंदे गटाने राज्यातील आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मात्र यामध्ये यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून कुणाचेच नाव जाहीर करण्यात आले नसल्याने भावना गवळी समर्थक अस्वस्थ झाले आहेत. भावना गवळी समर्थकानी मुंबई वारी करूनही त्याच्या नावाची घोषणा झाली नसल्याने उमेदवार बदलाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. उमेदवारीचा तिढा कायम राहिल्यास भाजप काय भूमिका घेणार, खासदार भावना गवळी यांना डावलून नवीन चेहरा दिला जाणार का? की अखेरच्या क्षणी खासदार भावना गवळी यांचेच नाव पुढे केले जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.

आणखी वाचा-वीजसंकट टळले! कोराडीतील ‘या’ संचातून वीजनिर्मिती सुरू

खासदार भावना गवळी, पालकमंत्री संजय राठोड एकत्र?

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाची उमेदवारी खासदार भावना गवळी यांनाच मिळावी, असा आग्रह गवळी यांच्यासह समर्थकांचा आहे.तर कधी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा होते. खासदार भावना गवळी यांच्यासह काही पदाधिकारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून गवळी यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणीही केली. मात्र त्यानंतर ही गवळी यांचे नाव जाहीर झाले नाही. परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड यांच्यात चर्चा झाल्याची माहिती असून त्यांचे एकत्र फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal washim lok sabha election bhavna gawlis name is not in the first list of shinde group pbk 85 mrj