नाशिक : भाजपच्या महाराष्ट्र विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्याबद्दल पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर फलकाच्या माध्यमातून दावा ठोकल्याने सरकार स्थापनेपूर्वीच महायुतीतील मित्रपक्षातील चढाओढ उघड झाली आहे. गतवेळी हातातून निसटलेले नाशिकचे पालकमंत्रिपद काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) सरसावली असताना भाजपने जल्लोषावेळी भाजपकडेच पालकमंत्रिपद, असे सूचक फलक झळकावत त्यांना डिवचले आहे. या चढाओढीत शिवसेना (एकनाथ शिंदे) स्पर्धेतही नसल्याची स्थिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल शहर भाजपच्यावतीने वसंतस्मृती कार्यालयाबाहेर ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. एकमेकाला पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रच्या नवंनिर्मितीसाठी फडणवीस यांची नियुक्ती महत्वाची असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी आणि विजय साने यांनी मनोगत व्यक्त केले. जल्लोषावेळी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असणारा फलक झळकत होता. तसेच पालकमंत्री उल्लेख व भाजपचे पक्षचिन्ह असणारा फलक होता. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडे हवे, हे सूचित करणारा फलक भाजयुमोचे शहराध्यक्ष सागर शेलार यांनी झळकवला. यानिमित्ताने भाजपने नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकण्याची तयारी सुरू केल्याचे अधोरेखीत झाले आहे.

हेही वाचा : नाशिक : नायलॉन मांजा निर्मिती, विक्री, वापरकर्ते आता तडीपार, पोलीस आयुक्तांचा कारवाईचा इशारा

अलीकडेच राष्ट्रवादी युवक (अजित पवार) पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री व्हावे म्हणून महादेवाला दुग्धाभिषेक करून साकडे घातले होते. गतवेळी महायुती सरकारमध्ये उशिराने सहभागी झालेल्या अजित पवार गटाला बरेच प्रयत्न करूनही नाशिकचे पालकमंत्रिपद मिळाले नव्हते. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) त्यांची मागणी धुडकावली होती. त्यामुळे महायुतीचे नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली. गतवेळी शिंदे गटाने पालकमंत्रिपद भाजपकडून हिरावून घेतले होते. ते पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपही तयारीला लागला आहे.

हेही वाचा : जळगावमध्ये ईव्हीएम विरोधात मोर्चा

शिंदे गटाचा आवाज क्षीण ?

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला सात, भाजपला पाच तर, शिंदे गटाला दोन जागा मिळाल्या. या संख्याबळाच्या आधारे अजित पवार गटाकडून पालकमंत्रिपदावर दावा ठोकला जात आहे. भाजपही जिल्ह्यात वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्रिपद आपल्याकडे घेण्यास उत्सुक आहे. या पदावरून भाजप- अजित पवार गटात चांगलीच स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत. गतवेळी हे पद आपल्याकडे राखणाऱ्या शिंदे गटाचा आवाज मर्यादित संख्याबळामुळे क्षीण झाल्याचे चित्र आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp claim on guardian ministership of nashik after selection of devendra fadnavis chief minister css