नाशिक – चांदवड तालुक्यात गुरुवारी रात्री शेतातून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. वन विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

रात्री शेतकरी रामदास आहेर (४५) हे शेतातून घराकडे येत असताना भडाणे-रायपूर शिवरस्त्यावरील एका ठिकाणी अंधारात बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घेतली. आहेर यांचा गळा जबड्यात पकडून रस्त्याच्या बाजूला झुडपात फरफटत घेऊन गेला. रस्त्याने सचिन आहेर हे दुसरे शेतकरी दुचाकीने जात असताना त्यांना झाडांमध्ये आवाज आल्यामुळे त्यांनी गाडीचा प्रकाश त्या दिशेने केला असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड करुन परिसरातील नागरिकांना बोलावले. आवाजामुळे बिबट्या पळून गेला. रामदास आहेर यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला.

वनविभागाने रात्रीच पंचनामा करून मृतदेह चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. आहेर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील, भाऊ असा परिवार आहे.