सध्याच्या घडीला विविध प्रकारची फळे आणि भाजीपाला यांच्यावर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अधिक प्रमाणात वापर होताना दिसत आहे. त्यामुळे अन्न विष झाले आहे. परिणामी देशात कर्करोग, रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू आणि ह्रदविकाराचा झटका यासारखे आजार मोठया प्रमाणात डोके वर काढताना दिसत आहेत. या आजारांवर मात करण्यासाठी मोठमोठी रुग्णालये उभी करण्यापेक्षा सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीवर भर देणे काळाची गरज आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील गावंधपाडा येथील शेतकरी यशवंत महादू गावंडे यांनी याच माध्यमातून विषमुक्त शेतीच्या विकासाचा ध्यास घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गावंडे यांच्या शेतामध्ये विविध प्रकारची पिके तीनही ऋतूत तग धरून राहिली. काही पिकांना नुकसान जरी झाले तरी त्याची कसर इतर पिकांनी भरून काढली. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी आत्मसात केलेली इस्राईल देशातील मिश्र शेती पद्धत. यामाध्यमातून त्यांनी हापूस, केसर, लंगडा, तोतापुरी अशा आंब्याच्या विविध प्रकारच्या जाती तसेच बोर, सीताफळ, शेवगा, पपई, मोसंबी, अंजीर, करवंद, तोरण, आळव अशी विविध प्रकारची पिके एकाच ठिकाणी पिकवली आहेत. या पिकांच्या वाढीसाठी जीवामृत, सेंद्रिय खत आणि गांडूळ खताचा वापर त्यांनी केला. कोणत्याही प्रकारची रासायनिक खते त्यांनी या पिकांना दिली नाही. तसेच कोणतेही किटकनाशक त्यांनी यावर फवारले नाही.

एक एकरात किमान ८०० झाडे लागतात. यातील एक आंब्याचे झाड वीस किलो आंब्याचे उत्पादन करत असेल तर या एका एकर शेतातील या एकाच पिकातून किमान ८०० ते १००० जाळी आंब्याचे उत्पादन होऊ शकते. या एक एकरातील मिश्र शेतीतून एक शेतकरी किमान ५-६ लाख रुपये उत्पन्न सहज मिळवू शकतो. आणि या आंब्यापासून इतर बाय प्रॉडक्टदेखील तयार करता येऊ शकतात, असे गावंडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे रासायनिक घटक न वापरता जीवामृत हे त्यांनी स्वतः तयार केलेले. २०० लीटर पाण्यामध्ये एक किलो गूळ, एक किलो बेसन पीठ, ५ ते १० लीटर गोमूत्र एकत्र करून त्याचे तीन दिवसांनी जे मिश्रण केले जाते त्याला ‘जीवामृत’ असे म्हणतात. हे जीवामृत ते आपल्या शेतातील प्रत्येक पिकाला आवश्यकतेनुसार देतात. तसेच त्यांनी आपल्या शेतात ४ सिमेंटचे हौद बांधून त्यात काळ्या मातीत गांडूळ खताची निर्मिती केली आहे. त्यांचा मुलगा, पत्नी, इतर भावंड आणि त्यांची कुटूंबं याच शेतात एकत्र मिळून शेती करतात.

आमचा शेतकरी आत्महत्या करत नाही
राज्यातील शेतकरी आत्महत्येसंदर्भात गावंडे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड आणि इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटनाचे वृत्त कानावर पडते तेव्हा मी व्यथित होतो. याच नाशिक जिल्ह्यातील पेठ हा तालुका आहे. येथील शेतकरी कर्जबाजारी झाला किंवा एखाद्या अस्मानी संकटाने व्यथित झाला तर तो आत्महत्या करत नाही. इथल्या शेतकऱ्याला सक्षम व्हायचं आहे. आपल्यावर आलेल्या संकटावर मात कशी करता येईल याचा तो विचार करतो. तो संतापून, व्यथित होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत नाही. यावेळी त्यांनी शेतीतील कोणत्याही पिकातील उत्पादन खर्च वजा करता त्यातील ५० टक्के रक्कम तरी राज्यातील शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. राज्य सरकार तथा केंद्र सरकारच्या विविध योजनांतून राज्यातील आदिवासींना मिळणाऱ्या गायी आणि म्हशी या लोकांना मिळत नाहीत, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. सरकार कोणत्याही पक्षाचे असो मात्र केंद्र सरकारने आजवर देशातील शेतकऱ्यांच्या बाबतीत कधीही गंभीरपणे लक्ष दिले नाही, असेही ते म्हणाले.

श्रीमंत धरण
यशवंत गावंडे यांनी आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी आपली १० एकर जमीन राज्य शासनाच्या पाठबंधारे विभागाला दिली. हे धरण एकूण ७५ हेक्टर आकारमानाचे आहे. यात गावातील इतर शेतकऱ्यांच्या देखील जमिनी गेल्या. ही जमीन सरकारला दिल्यामुळे गावंडे कुटुंबीय ही भूमिहिन झाले. श्रीमंत नदीवरून या धरणाला श्रीमंत धरण हे नाव विभागाने दिले. या धरणाचे काम सुरु असतानाच यशवंत गावंडे यांनी धरणालगत १४ एकर जमीन विकत घेतली. आणि शेतीचे उत्पादन घेण्यास नव्या जोमाने सुरवात केली. हे धरण आणि नदी कालांतराने खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरले. कारण या नदी आणि धरणामुळे गावंडे कुटुंबियांसह पेठ तालुक्यातील २०-२५ गावांतील लोकांची तहान भागलीच आणि या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी देखील मिळाली.

शेतीबरोबरच गावंडे यांचे ‘श्रीमंत आदिवासी शेती बचत गट, गावंधपाडा’ आणि ‘कृषिरत्न सेंद्रिय बचत गट, निर्गुडी आणि इतर’ असे दोन बचत गट आहेत. या दोन्ही गटात एकूण ८० सदस्य आहेत. तसेच त्यांची ‘श्रीमंत आदिवासी मच्छिमारी सहकारी संस्था’ देखील आहे. शेतातील एका छोट्याशा तलावातून तसेच त्यांच्या शेतालगतच्या श्रीमंत धरणातून विविध प्रकारचे मासे पकडण्यासाठी त्यांनी गावातील काही मजूर नेमले आहेत. हे मजूर रोज सकाळी या धरणातील पाण्यात पोहत जात मासे पकडण्यासाठी जाळे टाकतात. हे जाळे रात्रभर पाण्यात राहते. दुसऱ्या सकाळी या जाळ्यातून रोहू, कटला, झिंगा, कोंबडा असे विविध प्रकारचे मासे पकडले जातात. यातील कोंबडा मासा हा २०-२५ किलोचा असून तो बाजारात १०० रुपये प्रति किलो दराने विकला जातो. यातून मजुरांना ४० रुपये प्रति किलो प्रमाणे मजुरी मिळते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik farmer use israel farming technology and devloped farm