मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राज्यात लोकसभेच्या दहा जागा लढवत असून मविआ मध्ये आपल्या वाट्यास आलेल्या मतदारसंघात उमेदवार देताना पक्षाची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे राष्ट्रवादीने निम्म्या मतदारसंघात इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी देणे पसंत केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील रावेर मतदारसंघात श्रीराम पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांना भाजपातून आणलेले आहे. वर्धा मतदारसंघात उमेदवारी दिलेले अमर काळे हे काँग्रेसचे तीनवेळा आमदार राहिलेले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीचे सूतोवाच झालेले आहे. धैर्यशील हे सोलापूर जिल्ह्याचे भाजप संघटक म्हणून गेली पाच वर्षे काम पाहात होते.

हेही वाचा : केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

बीडमध्ये उमेदवारी दिलेले बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादीचे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर ते अजित पवार गटाबरोबर गेले होते. त्यांचाही नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश झालेला आहे. दक्षिण अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी दिलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पक्षाची दोन शकले झाल्यावर अजित पवार यांची साथ केली होती. बारामतीत सुप्रिया सुळे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे, भिवंडीत सुरेश म्हात्रे, सातारामध्ये शशिकांत शिंदे आणि दिंडोरीमध्ये भास्कर भगरे हे राष्ट्रवादीने उर्वरीत उमेदवारी आहेत. हे पाचही उमेदवार पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांच्याबरोबर कायम होते. पक्षफुटीनंतर पहिल्या फळीतील बहुतांश नेते शरद पवार यांची साथ सोडून गेले आहेत. उर्वरित अनेक नेत्यांना लोकसभा लढवण्याचा पक्षाने आग्रह केला. त्यातील अनेकांनी काही निमित्त सांगून लढण्यास नकार दिला. त्यामुळे पाच उमेदवार आयात करावे लागल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.