पुणे : प्रकृती अस्वस्थतेमुळे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे उद्या ६ मे रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. देशभरात होत असलेल्या लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी होत आहे. या टप्प्यातील प्रचार थांबला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिसर्‍या टप्प्यात राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघ देखील आहे. यंदा प्रथमच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासह राज्यातील अनेक भागात दौरे आणि सभांचा धडका लावला. त्याच दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराचा अखेरचा दिवस होता. त्या निमित्ताने आज दुपारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पवार कुटुंबातील सर्व सदस्यांसह नागरिकदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी: श्रीरंग बारणेंसाठी अभिनेता गोविंदा सरसावला! केला बारणेंचा प्रचार

शरद पवार यांच्या जवळपास ५५ वर्षांच्या राजकीय जीवनात आजवर कधीच पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली नव्हती. पण यंदा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. यंदाच्या या निवडणुकीत दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी कोणीच सोडली नाही. त्या सर्व घडामोडी दरम्यान आज सांगता सभेत शरद पवार नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार भाजपसोबत?; वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा दावा 

शरद पवार भाषणावेळी उभे राहिले होते. ते काहीसे थकल्या सारखे वाटत होते. त्यामुळे बोलतानाही त्यांचा आवाज कातर होत होता. घसा बसल्याने शब्द देखील नीट फुटत नव्हते. त्यामुळे ते केवळ ४ ते ५ मिनिटेच भाषण करू शकले. त्यानंतर सभेच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार, अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उद्या ६ मे रोजी होणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून कळविण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेवेळी शरद पवार हे भाषण करित होते. त्यावेळी त्यांच्या आवाजात थकवा जाणवत होता आणि घसा देखील बसला. त्यामुळे उद्या ६ मे रोजी शरद पवार यांच्या होणार्‍या अनेक बैठका आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांची कात्रज येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली, तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा पार पडणार होती. मात्र शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे – प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All monday programs canceled due to sharad pawar ill health svk 88 ssb