"हॅलो, वसंत मोरे? मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचं आहे"; राज यांनी उचलबांगडी केलेल्या पुण्याच्या माजी मनसे शहराध्यक्षांना फोन | Pune City Shivena Chief Called Vasant More And Tried to Connect with CM Uddhav Thackeray svk 88 scsg 91 | Loksatta

“हॅलो, वसंत मोरे? मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचं आहे”; राज यांनी उचलबांगडी केलेल्या पुण्याच्या माजी मनसे शहराध्यक्षांना फोन

भोंग्यांविरोधी भूमिका घेतल्याने वसंत मोरेंना मनसेने पदावरुन हटवल्याची चर्चा असतानाच या वादात शिवसेनेने उडी घेतल्याचं चित्र दिसतंय.

Vasant More Raj Uddhav
पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसतंय (प्रातिनिधिक फोटो)

मनसेचे पुणे शहर अध्यक्ष राहिलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उघडउघड नाराजी व्यक्त केल्यावरनंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून बाजूला करण्यात आले आहे. त्यानंतर वसंत मोरे यांना अनेक पक्षाकडून ऑफर येत असताना, काल म्हणजेच गुरुवारी शिवसेना पुणे शहर प्रमुखांचा वसंत मोरे यांना फोन आला. मुख्यमंत्री साहेबांना आपल्याशी बोलायच आहे, असं मोरेंना सांगण्यात आलं. मात्र मोरे यांनी शिवसेना शहर प्रमुखांना सांगितले की, “मी बाहेर आहे.” तसेच, “या फोनबाबत आपण राज ठाकरेंना सर्व गोष्टींची कल्पना दिलीय,” असं वसंत मोरे यांनी सांगितले. त्याच बरोबर मला सर्व पक्षाकडून ऑफर आहेत, पण मी मनसेमध्येच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नक्की वाचा >> पुणे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी राज ठाकरेंकडून…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मुंबईतील जाहीर सभेत अनेक मुद्यांना हात घातला. राज यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. या जाहीर सभेत मशीदीवरील भोंगे न काढल्यास तिथे स्पिकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू असे विधान राज यांनी केले होते. या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. त्याचदरम्यान या भूमिकेला विरोध करत पुण्यात मनसेच्या चार पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहेत. तर वसंत मोरे यांनी उघडउघड राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही तासांमध्ये राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून बाजूला करीत त्यांच्या जागी महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची धुरा दिली. त्यामुळे आता वसंत मोरे पुढे कोणत्या पक्षात जाणार, या चर्चांना उधाण आले आहे.

वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यास त्यांचं निश्चित स्वागतच केले जाईल,अशी खुली ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. तर काही दिवसांपूर्वी मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या रुपाली पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय. “वसंत भाऊ तुझं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत आहे,” असं त्या म्हणाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांकडून वसंत मोरे यांना पक्षप्रवेशासंदर्भात विचारणा होत आहे.

नक्की वाचा >> पुण्यातील मनसे शहराध्यक्षांचा राज यांना घरचा आहेर; भोंगे लावण्यास नकार देत म्हणाले, “राजसाहेबांचं भाषण कळलंच नाही, आम्ही…”

त्याच दरम्यान, शिवसेना पुणे शहर प्रमुख यांचा वसंत मोरे यांना फोन आल्याची माहिती मोरे यांनीच दिलीय. “मुख्यमंत्र्यांना, आपल्याशी बोलायच आहे. पण मी शहर प्रमुखांना सांगितले की, मी बाहेर आहेत. तसेच या सर्व गोष्टी बाबत राज साहेब ठाकरे यांना कल्पना मी दिली,” असंही वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

पुणे महापालिका निवडणुकीला अद्याप बराच काळ बाकी असून मनसेकडून झालेल्या कारवाईमुळे वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात वसंत मोरे पक्षांतर करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-04-2022 at 12:21 IST
Next Story
पुणे: मनसे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा; वसंत मोरेंची हकालपट्टी आणि मशिदीच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेमुळे नाराजी