अतुल सुलाखे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैदिक परंपरेत एकत्र येऊन केल्या जाणाऱ्या शास्त्रचर्चाना परिषदा म्हणत. वादसभाही होत. तर ‘संगीति’ हा बौद्ध आणि श्रमण परंपरांचा विशेष होता. बौद्ध संप्रदायाच्या संगीतिमध्ये भिक्खूसाठीच्या नियमांवर चर्चा होई तर जैन संगीतिंमध्ये धर्मतत्त्वांची रचना कशी करावी यावर चर्चा होई. परिषदा आणि संगीति यांनी भारतीय दर्शनांमध्ये मोलाची भर घातली आहे.

या प्राचीन परंपरेचे विनोबांनी एका अर्थी पुनरुज्जीवन केले. महावीरांच्या अडीच हजार निर्वाण वर्षांनिमित्त त्यांनी श्रमण परंपरेतील सर्व प्रमुख मुनींना एकत्र आणून ‘समणसुत्त’ जैन धर्माच्या शिकवणुकीचा सारग्रंथ तयार होईल असे पाहिले.

गांधींच्या विचारांकडे कसे पाहायचे, ते विचार पुढे कसे न्यायचे यासाठी १९४८ मध्ये जे संमेलन झाले ती ‘सर्वोदयाची संगीति’ होती. गांधीजींचा विचार ‘सर्वोदय’ म्हणून ओळखला जावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले तरीही ‘गांधीइझम’ म्हणण्याची आपली हौस फिटत नाही. सर्वोदयाची खोली गांधीवादाला नाही.

त्या संमेलनात आचार्य शंकरराव देव यांनी ‘सर्वोदय समाजा’चा ठराव मांडला. त्याला पाठिंबा देत विनोबांनी आपले विचार मांडले. ‘समाज व्यापक असतो आणि सर्वोदय शब्दामुळे त्याची व्यापकता परिपूर्ण होते. पुष्कळसे काम नावानेच होऊन जाते. चांगल्या नावात जीवन परिवर्तन करण्याची शक्ती असते. सर्वोदय शब्द खेडय़ांतील लोकांना थोडा कठीण वाटण्याचा संभव आहे खरा. सत्याग्रह शब्ददेखील असाच कठीण होता परंतु प्रत्यक्ष कृतीमुळे तो सोपा झाला. तसाच हा शब्द आहे. ठरावाच्या मागे एक महान विचार आहे. एक गांधी गेला त्याच्या जागी करोडो गांधी उत्पन्न व्हावेत अशी त्याच्यात शक्ती आहे. ही संस्था नियंत्रण करणारी नाही किंवा सत्ता चालवणारी नाही, म्हणून यात काही भय नाही. या ठरावातील विचार क्रांती करणारा आहे.’

सर्वोदय समाजाच्या स्थापनेमध्ये गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करणाऱ्या सर्व संस्थांचे ऐक्य असावे त्या दृष्टीने ‘सर्व संघ’ या संस्थेची निर्मिती करण्यात आली. तथापि २७ एप्रिल १९४८ रोजी ११ संस्थांच्या बैठकीत ‘अखिल भारतीय सर्व सेवा संघ’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये सर्वोदयाच्या विचाराने काम करणाऱ्या सर्व संस्थांचे विलीनीकरण करण्यात आले.

सर्वोदय समाजाने कोणते कार्य करावे यावर विनोबांचे नियंत्रण नसणार हे उघड होते. कारण नियंत्रण म्हटले की हिंसा आली आणि सर्व प्रकारच्या हिंसेला त्यांचा सदैव विरोध होता. विनोबांच्या मते, सर्वोदयाचे ध्येय गाठण्यासाठी गांधीजींनी देशाला दोन कार्यक्रम दिले. शरीर परिश्रम आणि कांचनमुक्ती. शरीर परिश्रम आणि एकादश व्रते यांच्या आचरणाशी ते एकनिष्ठ होते. कांचनमुक्तीसाठी त्यांनी ऋषी शेतीचा प्रयोग केला.

एकदा एक निर्णय घेतला की मागे वळून पाहायचे नाही ही विनोबांची कार्यपद्धती होती. सर्वोदयाची वाटचाल करताना त्यांनी ती दोन दशके अमलात आणली. त्यांची निष्ठा एवढी प्रगाढ होती की सर्वोदय म्हटले की विनोबांचे नाव येते.

प्राचीन संगीतिमध्ये धर्मकारणातील मान्यवरांचा समावेश असे. या सर्वोदय संगीतिमध्ये राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान आणि आचार्य यांनी सहभाग घेतला होता. हा आचार्य एका महात्म्याचे तत्त्वज्ञान सांगत होता. ही घटना अपूर्व म्हणावी अशी आहे. jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyog acharya vinoba bhave associated with sarvodaya zws