अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे आज दिवसभर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. केतकीनं तिच्या फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये शरद पवारांवर खालच्या स्तरावर टीका केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी टीका केली. जितेंद्र आव्हाडांसह सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केतकीवर कारवाईची मागणी केली. तिच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, तिला ठाणे क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात येत असताना तिच्यावर काळी शाई फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून केतकी चितळे हिला आधी ताब्यात घेतलं होतं. तिची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. यानंतर तिला कळंबोली पोलीस स्थानकातून ठाणे क्राईम ब्रांचच्या हवाली करताना स्थानकाच्या बाहेरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केतकी चितळेच्या अंगावर काळी शाई फेकून तिच्या सोशल पोस्टचा निषेध केला. यानंतर पोलीस तिला गाडीत घेऊन गेले. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून केतकी कळंबोलीतील अव्हेलोन इमारतीत राहत होती.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एक कडून सुरू होता. पोलिसांकडून केतकीचा सर्वत्र शोध सुरू होता. केतकी ही नवी मुंबई येथील कळंबोली भागात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले. तिला कळंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा तिचा ताबा ठाणे पोलिसांनी घेतला. तिला अटक करण्यात आली असल्याची माहिती युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.

“या अशा चार-दोन विकृत टाळक्यांमुळे…”, राज ठाकरेंनी शरद पवारांविषयीच्या ‘त्या’ पोस्टवरून केतकी चितळेला सुनावलं!

अभिनेत्री केतकी चितळेनं केलेल्या फेसबुक पोस्टवर खुद्द राज ठाकरेंनी देखील नारीजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. “कुणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. या लिखाणाला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो”, असं ट्विटरवर पोस्ट केलेल्या आपल्या पत्रात राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress ketaki chitale arrested by thane police post on sharad pawar pmw
First published on: 14-05-2022 at 19:33 IST