राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून करण्यात आलेल्या एका सोशल मीडिया पोस्टवरून सध्या राज्याच्या राजकारणात सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून नाराजीचा सूर व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून श्लोक प्रकारातून पोस्ट केलेल्या ओळींमधून शरद पवारांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केलेला असताना केतकी चितळेविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांवर सातत्याने टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी देखील केतकी चितळेला सुनावलं आहे. यासाठी राज ठाकरेंनी ट्विटरवर खुलं पत्रच पोस्ट केलं आहे.

काय आहे पत्रात?

राज ठाकरेंनी आपल्या पत्रामध्ये केतकी चितळेच्या पोस्टवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “कुणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. या लिखाणाला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो”, असं आपल्या पत्रात राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
What Ajit Pawar Said?
“द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?”, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार काय बोलून गेले?
What Sharad Pawar Said About Raj Thackeray?
‘राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने सामान्य माणूस संभ्रमात’, शरद पवार म्हणाले, “मी पण सामान्य माणूस”
bacchu kadu reaction on mahayuti
प्रहार पक्ष महायुतीबरोबर की विरोधात? बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”

“विचारांचा मुकाबला विचारांनीच व्हावा”

शरद पवारांवर असं लिखाण साफ गैर असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. “महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो. त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत! आमचे त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत आणि राहतील. पण अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे, तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला हवा”, असं या पत्रात राज ठाकरेंनी नमूद केलं आहे.

“परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये”

“चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतांनी आपल्याला शिकवलं. कुणीही या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये ही अपेक्षा”, असं देखील या पत्रात राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी!

“पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कुणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते. समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राची ओळख वेगली आहे. म्हणूनच राज्यसरकारनं याचा नीट छडा लावून या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा”, अशी मागणी राज ठाकरेंनी राज्य सरकारकडे केली आहे.