ग्रीक पुरणकथेत मेंटोर हा ओडेसेस राजाचा मित्र होता. युद्धावर जाताना राजा आपल्या म्हाताऱ्या मित्राला, मेंटोरला आपला राजवाडा आणि आपला पुत्र तेलेमाकस रक्षणास सुपूर्त करून जातो. राजाच्या अनुपस्थितीत मेंटोरच्या विवेकशील सल्ल्याने तेलेमाकस आलेली विघ्नं अगदी निर्भिडपणे पार पार पाडतो.
आपल्या पुराणकथांमध्येही अशा अनेक व्यक्ती आढळतात. फरक एवढाच की, आपण त्यांना गुरू म्हणून संबोधतो. कृष्ण- अर्जुन, स्वामी रामदास- शिवाजी महाराज अशा अनेक ऐतिहासिक गुरू-शिष्यांबाबतच्या कथांशी आपण परिचित आहोत.
आजही अनेकांना आयुष्याला दिशा मिळावी, म्हणून आपल्या आध्यात्मिक गुरूचे मार्गदर्शन जरूरी वाटते. आयुष्यातील ३० ते ४० वर्षांचा कालावधी – ज्यावेळेस आपण कार्यरत असतो, तेव्हा कधी न कधी बिकट परिस्थितीला तोंड देताना अनुभवी सल्ल्याची गरज ही असतेच!
शिष्य तयार असल्यावर गुरू आपोआपच प्रकट होतो, अशी म्हण आहे. पण आता कोणी शिष्य तयार होण्याची अथवा गुरूच्या प्रकट होण्याची वाट न पाहता अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ‘मेंटोर्स’ नेमून देतात.
मेंटोर हा शब्द आता कॉर्पोरेट क्षेत्रात अशी व्यक्तीला उद्देशून असतो, जो आपल्या कमी अनुभवी सहकाऱ्यांना असेच सल्ले आणि ज्ञान देते आणि मेन्टरिंग म्हणजे ती क्रिया ज्याने एक व्यक्ती (मेंटर) इतर व्यक्तीला अथवा कंपनीला त्यांचे सामथ्र्य प्राप्त करण्यास मदत करते.
सगळ्यांनाच अधूनमधून पाठीवर कौतुकाची, प्रेरणा देणारी थाप हवी असते. ‘पाठीवरती हात ठेऊन तुम्ही फक्त लढ म्हणा..’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या ओळीसारखी बळ देणारी थाप कर्मचाऱ्यांचे मनोबळ उंचावते. मेंटोरिंगमध्ये नक्की काय केलं जातं? या गुरूकडून आपल्याला काय मिळतं?
१) जजमेंटल न होता, आपण करतो ते (मग ते कामाविषयी अथवा सहकाऱ्यांसोबतची वर्तणूक असो) योग्य आहे की अयोग्य हे सांगणारं कोणी असल्यास, मनाला एक प्रकारचा दिलासा मिळतो.
२) आपले म्हणणे ऐकायला कान मिळतात, प्रोत्साहन देणारं मिळतं आणि बोट न पकडता मार्गदर्शन तर मिळतच मिळतं!
३) स्वत:च्या डोक्याला चालना देणारे प्रश्न विचारणारं मिळतं आणि उद्भवलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच शोधायला मदत करणारं मिळतं.
४) नवीन संकल्पना आणि त्यातील बारकावे शिकवणारं कोणीतरी मिळतं.
५) संधी कुठे दडली आहे, ते समजतं आणि वाटेतल्या खाचखळग्यांची जाणीव करून दिल्याने आपण सावधपणे वाटचाल करतो.
६) दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता वाढविण्यास मदत करणारं मिळतं.
७) आपले स्वत:चे अवगुण वा त्रुटी दाखवून देणारं मिळतं.
८) ऑफिसच्या राजकारणात आपण गुंतू नये वा त्यात रुतून बसू नये, हे सांगणारं कुणीतरी मिळतं.
कामाच्या ठिकाणी जेव्हा मेन्टोर्स उपलब्ध करून दिले जातात, तेव्हा मेन्टर आणि मेंटी या दोघांचा सुसंवाद असणे अत्यावश्यक असते. आपला मेन्टॉर कसा असावा, याबद्दल प्रत्येकाच्या मनात काही आराखडे असतात. ही अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होणे महत्त्वाचे ठरते. या अपेक्षा काहीशा पुढीलप्रमाणे असतात –
१) नॉन-जजमेंटल
२) विश्वासपात्र
३) दूरदृष्टीचा आणि योग्य दिशा दाखविणारा
४) संयमशील
५) स्वत:च्या कामात निपुण
६) अत्याधुनिक ज्ञानाची माहिती असणारा/ असणारी
ज्यांना ऑफिसतर्फे मेंटोर नेमून दिला नसतो, त्यांनी आपला मेंटोर निवडावा. आपल्या कामाहून अन्य क्षेत्रातला असला तरी चालेल. अनेक जण एक मेंटोर शोधण्याऐवजी अनेकांना आपले मेंटोर मानतात. त्या व्यक्तीचे वाखाण्याजोगे पैलू आत्मसात करायचा प्रयत्न करतात. पण या साऱ्यांचेच सल्ले एकमेकांशी विसंगत असले की, मग कोणाचा सल्ला मानायचा हा संभ्रम निर्माण होतो.
मेन्टरिंग हे एक कसब असून, ते काहीजणांमध्ये उपजतच असते. ही एक कलाही आहे. सल्ले कोणीही देऊ शकतं. पण ते कोणत्या वेळी, कोणाला आणि कशा रीतीने दिले पाहिजे, यातही एक प्रकारचे कौशल्य संपादन करणे आवश्यक असते. दुसऱ्यांच्या जडणघडणीत हातभार लावायचा असेल तर स्वत:मध्ये शिस्तप्रियता आणि वस्तुनिष्ठपणा असणे गरजेचे आहे. शिवाय यात आर्थिक मोबदला मिळत नाही. आपल्या मार्गदर्शनामुळे कोणाचे तरी भले होते आहे आणि त्या व्यक्तीच्या प्रगतीतच आपले यश आहे, याची जाणीव ज्यांना असते ते चांगले मेंटोर होऊ शकतात. मेंटीचे यश हीच त्यांची गुरुदक्षिणा ठरते!
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2013 रोजी प्रकाशित
रूपांतरण : दिशादर्शक
ग्रीक पुरणकथेत मेंटोर हा ओडेसेस राजाचा मित्र होता. युद्धावर जाताना राजा आपल्या म्हाताऱ्या मित्राला, मेंटोरला आपला राजवाडा आणि आपला पुत्र तेलेमाकस रक्षणास सुपूर्त करून जातो. राजाच्या अनुपस्थितीत मेंटोरच्या विवेकशील सल्ल्याने तेलेमाकस आलेली विघ्नं अगदी निर्भिडपणे पार पार पाडतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-04-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Direction indicator