विक्रांत भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CSAT ची मागणी आणि विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण

या अगोदरच्या लेखाचा समारोप करताना आपण असे म्हटले होते की CSAT हा पात्रता पेपर करण्यात आल्यामुळे बऱ्याच उमेदवारांना तो आता सोपा वाटून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले आहे. पण यामुळे एकतर उमेदवार पूर्व परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होत आहेत वा मुख्य परीक्षेसाठी लागणाऱ्या कौशल्य बांधणीपासून मुक्त आहेत. जर परिस्थिती अशी आहे तर फक्त नवीन उमेदवारच नाही तर या विषयाच्या अभ्यासामध्ये मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांनी देखील या विषयाची मागणी आणि याचा अभ्यास करताना येणारी आव्हाने समजून घेण्याची नितांत गरज आहे.

CSAT मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतून विचारण्यात येतात. महाराष्ट्रातून या परीक्षेला बसलेले काही उमेदवार जरी ते मुख्य परीक्षा मराठीतून लिहिणार असले तरी, इंग्रजी भाषेचाच वापर करताना आढळून येतात. म्हणूनच या विषयातील प्रश्नांची यशस्वीरित्या उत्तरे देण्यासाठी इंग्रजीतील वाक्यांचे आणि पर्यायाने उताऱ्यांचे आणि प्रश्नांचे आकलन होईल एवढी क्षमता विकसित होणे अपेक्षित आहे. या मागणीबाबत फक्त मराठी माध्यमातूनच नाही तर इंग्रजी माध्यमातून पदवी प्राप्त केलेले उमेदवारदेखील अनभिज्ञ असतात. आणि जेव्हा त्यांना या मागणीची जाणीव होते तेव्हा ते परीक्षेच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेले असतात. त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी इंग्रजी भाषेच्या पायाभूत घटकांवर काम करण्यास सुरुवात करावी. कारण जर माहितीचे आणि त्याआधारित प्रश्नाचे आकलन झाले नाही तर तो प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीचे ज्ञान मराठीतून जरी झाले असले तरी त्याचा फार काही फायदा होणार नाही. इथे पायाभूत घटकांमध्ये लेखन कौशल्य वा संवाद कौशल्याचा समावेश होत नाही. पण इंग्रजीतील सर्वसाधारण वापरातील शब्द, व्याकरण, विविध पद्धतीच्या वाक्य रचना, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी इ. ची माहिती असणे आवश्यक आहे. या विषयाची पूर्व परीक्षेसाठी तयारी करताना इंग्रजी भाषेच्या आकलनाची किमान क्षमता निर्माण करणे हीच या चाचणीची प्राथमिक तसेच मुख्य मागणी आणि आव्हान आहे.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : ‘आरपीएफ’मधील भरती

या मुख्य मागणी व्यतिरिक्त अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाची स्वत:च्या काही मागण्या आहेत. आपण जेव्हा त्या घटकांवर सविस्तर चर्चा करू तेव्हा त्या मागण्यांचा विचार करूयात. आता आपण गेल्या काही वर्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विषयवार विश्लेषण करूयात.

सर्वांत जास्त प्रश्न विचारण्यात आलेला घटक म्हणजे सामान्य बौद्धिक क्षमता आणि अंक गणित ( BN and GMA) हा आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये सरासरी ३५ प्रश्न विचारण्यात आले आहेत. फक्त सन २०१२ याला अपवाद आहे. विज्ञान शाखेची पार्श्वभूमी नसलेले विद्यार्थी बऱ्याचदा गणित या विषयाला घाबरून या घटकाकडे दुर्लक्ष करतात. परंतु त्यांचे असे करणे हे किती चुकीचे आहे हे जर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कसे सोडवले जाते हे पाहिले तर त्यांच्या लक्षात येईल. कारण विचारलेल्या प्रश्नांची काठीण्यपातळी ही शालेय अभ्यासक्रमापेक्षा निश्चितच जास्त नाही.

यानंतरचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे उताऱ्यावरील आकलन क्षमता ( RC) हा आहे. या घटकावरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एकतर इंग्रजी वा हिंदी भाषाच वापरावी लागते. जरी महाराष्ट्रातील बहुतांशी उमेदवार इंग्रजी भाषेचा वापर करताना दिसून येतात तरी देखील ते या भाषेच्या प्राथमिक अभ्यासाकडे म्हणजेच शब्दार्थ आणि व्याकरण यांकडे हवे तेवढे लक्ष देत नाहीत. काहीजण इंग्रजीच्या भीतीपोटी या घटकाकडे दुर्लक्ष करतात. याचाच परिणाम पूर्वपरीक्षेच्या निकालावर झालेला दिसून येतो. याउलट जर इंग्रजी भाषेची पुरेशी तयारी केली तर याचा फायदा फक्त पूर्व परीक्षेसाठीच न होता तो मुख्य परीक्षेसाठी देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसून येईल. कारण नागरी सेवा परीक्षेचे बरेच साहित्य हे इंग्रजीमधूनच वाचावे लागते. इंग्रजी भाषेवरच्या पुरेशा कौशल्यामुळे मुख्य परीक्षेच्या विषयांचे विस्तृत आणि सखोल ज्ञान घेण्याच्या मार्गातले बरेचसे अडथळे दूर होतात.

तिसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा घटक म्हणजे तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता ( LRAA) हा आहे. या घटकावर सरासरीने दरवर्षी २० पेक्षा अधिक प्रश्न विचारण्यात आले आहेत. परंतु गेल्या चार वर्षांमध्ये या घटकांवरील प्रश्नांचे प्रमाण कमी झाले आहे. या घटकावरील सर्व प्रश्नांची उत्तरे ठरलेल्या वेळेत आणि अचूकरित्या देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेसा सराव. कारण इथे कोणतीही सूत्रे वा प्रमेय कामी येत नाहीत. तसेच प्रश्नांमध्ये बऱ्याचदा मुद्दाम शब्दच्छल केलेला आढळून येतो वा वाक्य मुद्दाम क्लिष्ट केलेली असतात. इथेही इंग्रजी भाषेच्या आकलनाचा फायदाच होतो. हा घटक बहुतेक उमेदवारांना सोपा जातो.

या तीन महत्त्वाच्या घटकांशिवाय इतर घटकांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या संख्येमध्ये आपल्याला सातत्य आढळून येत नाही. जसे की, दिलेल्या माहितीचे आकलन आणि माहितीचे पर्याप्तीकरण ( DIDS) या घटकावर जिथे सन २०१७ पर्यंत जास्तीतजास्त ५ प्रश्न विचारले गेले होते तिथे सन २०१८ मध्ये एकदम १४ प्रश्न विचारले गेले आहेत. गेल्या चार वर्षांत या घटकावर सतत प्रश्न आले आहेत. तसेच आंतरवैयक्तिक कौशल्य व संभाषण कौशल्य ( DM & ISCS) या घटकांवर २०१५ पासून एकही प्रश्न विचारला गेला नाही. पुढील लेखामध्ये आपण इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान कसे घ्यावे आणि आकलन क्षमता या घटकाची तयारी कशी करावी, हे पाहूयात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi zws 70