Success Story Bhausaheb Navale pune: अलीकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरी सोडून वेगवेगळ्या व्यवसायांकडे वळत आहेत. या व्यवसायांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा नफा मिळवीत आहेत. तरुणाईकडे जबाबदारी कमी, तसेच वेळ जास्त असल्याने ते या वयात धोका पत्करू शकतात. मात्र, ऐन कोरोनाच्या काळात जिथे प्रत्येक जण आपली नोकरी वाचण्यासाठी धडपड करीत होता, तिथे वयाच्या पन्नाशीत असलेल्या भाऊसाहेब नवले यांनी लाखोंची नोकरी सोडून काही वेगळं करण्याचं ठरवलं. वयाची पन्नाशी आणि कोरोनाचा पडता काळ, अशा वेळी जेव्हा बहुतेक लोक जोखीम घेण्यास घाबरत होते. तेव्हा या काळातही पिंपरीच्या भाऊसाहेब नवले यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि आज ते करोडोंची उलाढाल करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अडीच लाखांची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय

एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर आणखी मोठे यश मिळवता येते. असेच काहीसं महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवासी भाऊसाहेब नवले यांनी केलं. करोना काळात एकीकडे लोकांना कामावरून काढून टाकले जात होते तर दुसरीकडे, भाऊसाहेबांनी नोकरी सोडून वेगळीच वाट धरली. भाऊसाहेब नवले यांनी महिन्याला अडीच लाख रुपयांची चांगली पगाराची नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली.

कोण आहेत भाऊसाहेब नवले

अनेक जण आपला व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात; परंतु सर्वच जण यशस्वी होत नाहीत. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून व्यवसाय केला आणि ते यशस्वी झाले. त्यातलेच एक उदाहरण म्हणजे भाऊसाहेब नवले. भाऊसाहेब नवले हे पुण्यातील मावळ तालुक्यातील असून, परदेशात दरमहा लाखोंच्या पगारावर नोकरी करीत होते. एक दिवस घसघशीत पगाराची नोकरी सोडून त्यांनी भारतात परत येऊन नर्सरीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. विशेष म्हणजे जेव्हा त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला तेव्हा त्यांचे वय ५० वर्षे होते. मायदेशात परतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ग्रीन अॅण्ड ब्लूम्स नर्सरी सुरू केली. भाऊसाहेब नवले हे B.Sc. ॲग्रीकल्चर असून एकीकडे लोक नोकरीसाठी धडपडत असताना मंदीच्या काळातही संधी शोधण्यासाठी भाऊसाहेबांनी इनडोअर पॉट-प्लांट नर्सरीचा व्यवसाय सुरू केला.

हेही वाचा >>अपयशातून यशाकडे! अखेर नऊ वर्षांनंतर मिळवला सीएचा मुकुट; कसा होता हिमांशु भानुशालीचा खडतर प्रवास एकदा वाचा

तरुणांना रोजगार दिला

भाऊसाहेब नवले यांनी १९९५ ते २०२० अशी तब्बल २५ वर्षे नोकरी केली. त्यातील १० वर्षे त्यांनी इथिओपिया देशात पॉलिहाऊसमधील गुलाब उत्पादनाचा अनुभव घेतला, तिथून पुन्हा ते मायदेशात परतले अन इथे नर्सरीत नोकरी केली. अडीच लाख असा उत्तम पगारही होता, सर्व गरजा भागत होत्याच. पण, असे असतानाही वयाच्या पन्नाशीत भाऊसाहेबांनी ऐन कोरोनातच नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. भाऊसाहेबांनी कोरोनामध्ये अर्ध्या एकरात सुरू केलेला व्यवसाय सध्या एक एकरात विस्तारलाय. या नर्सरीत ते १०० प्रकारच्या रोपांची लागवड करतात अन् देशातील तब्बल ३०० छोट्या-मोठ्या नर्सरी त्यांच्याकडून रोपे खरेदी करतात. त्यामध्ये त्यांनी अनेक तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिलाय.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhausaheb navale success story quit job worth rs 2 5 lakhs during corona started nursery business today turnover in crores srk