एपी, कैरो : लिबीयातील प्रचंड विध्वंसकारी पुरामुळे पूर्वेकडील डेर्ना शहरात मृत्युमुखी पडलेल्या ७०० जणांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले असून पूर्व लिबीयात सुमारे दहा हजार नागरिक बेपत्ता आहेत. अनेक मृतदेह अद्याप गाळाखाली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भूमध्य समुद्रातील डॅनीएल वादळामुळे रविवारी रात्री ढगफुटी होऊन प्रलयंकारी पूर आला. त्यामुळे पूर्व लिबीयाच्या अनेक शहरांत मोठा विध्वंस झाला. त्यापैकी सर्वाधिक हानी डेर्ना शहरात झाली आहे. तेथे प्रचंड पाऊस आणि पुरामुळे धरणे फुटली आणि त्या लगतच्या परिसरात होत्याचे नव्हते झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
डेर्ना शहरातच सुमारे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला असावा, असे आधी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तेथे काम करणाऱ्या रुग्णवाहिका आणि मदत पथकांतील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा दोन हजार ३०० इतका आहे. पण त्यासाठी कोणताही ठोस आधार दिलेला नाही. रेडक्रॉस आंतरराष्ट्रीय महासंघ आणि रेड क्रिसेंट सोसायटीजवरील लिबीयाचे दूत तामेर रामदान यांनी सांगितले की, पुरात सुमारे दहा हजार लोक बेपत्ता झाले आहेत. टय़ुनिशियातून दूरचित्र संवादाद्वारे जीनिव्हात संयुक्त राष्ट्रांतील पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की, पुरात मोठय़ा प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडले असून हा आकडा वाढू शकतो.
या शहरांत हानी
डेर्ना, बायदा, सुसा, मर्ज आणि शाहत. ईशान्य लिबीया हा देशाचा सर्वाधिक सुपीक आणि हरित प्रदेश आहे. बायदा, मर्ज आणि शाहत ही शहरे वसलेला जबल अल अखदर हा भाग देशात सर्वाधिक सरासरी पर्जन्यवृष्टी होणाऱ्या प्रदेशांपैकी आहे.
दोन धरणे फुटल्याने विध्वंस
पूर्व लिबीयाचे पंतप्रधान ओसामा हमद म्हणाले की, दोन धरणे फुटल्याने आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेले आहेत. डेर्ना शहरात झालेली हानी भरून काढणे हे या देशाच्या क्षमतेबाहेरचे काम आहे.
परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. डेर्ना शहराच्या अनेक भागांत अद्याप मृतदेह पडून आहेत. रुग्णालयांत मृतदेहांचा खच पडला आहे. आम्ही मदतकार्यासाठी अजुनही अनेक भागांत पोहोचू शकलो नाहीत. -ओथमन अब्दुल जलील, पूर्व लिबीयाचे आरोग्यमंत्री