अमेठी मतदारसंघाच्या विकासासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च झाले, मात्र, विकास कुठेच दिसत नाही, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी सोमवारी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली. कुमार विश्वास कालपासून अमेठी मतदारसंघामध्ये आहेत. रविवारी त्यांनी अमेठीमध्ये सभाही घेतली.
राहुल गांधी २६ जानेवारी २००८ रोजी या मतदारसंघातील रहिवासी सुनीता यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी गावातील लोकांसोबत एक रात्र काढली होती. कुमार विश्वास यांनी सोमवारी सुनीता यांच्या घरी भेट दिली. राहुल गांधी यांच्या भेटीनंतरही सुनीता यांची परिस्थिती सुधारली नाही. आजही त्या कष्टप्रद आयुष्य जगताहेत, असे कुमार विश्वास या भेटीनंतर म्हणाले. कुमार विश्वास यांनी सुनीता यांच्यासोबत त्यांच्यापुढील प्रश्नांबाबत चर्चा केली आणि त्यांना हवी ती मदत तातडीने करावी, अशी सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना केली.
मतदारसंघावर ५५ हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतरही अजून गावात वीज नाही, नळाला पाणी येत नाही, विकासाची कुठलीच काम झालेली दिसत नाही. मतदारांनी याचा जाब राहुल गांधी यांना विचारावा, असे कुमार विश्वास म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap leader vishwas claims no development in amethi