आम आदमी पक्षाला महाराष्ट्रात चेहरा मिळत नसल्याने पंचाईत झाली आहे. सध्या तरी राज्यात अंजली दमानिया व मयंक गांधी हेच आम आदमी पक्षाचे नेते समजले जातात. परंतु उभय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केल्याने राज्यात नव्या चेहऱ्याचा शोध आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सुरू केला आहे. दमानिया व गांधी यांच्या जिवावर राज्यात फारशी चमकदार कामगिरी करता येणार नाही, अशीही चर्चा ‘आप’च्या गोटात सुरू आहे.  ज्या राज्यांत भ्रष्टाचाराची चर्चा सुरू आहे, त्या राज्यांमध्ये सर्व ठिकाणी आम आदमी पक्ष उमेदवार उभे करणार आहे. महाराष्ट्रात सिंचन घोटाळा, आदर्श सोसायटी प्रकरणामुळे ‘आप’ला चांगली मते मिळण्याची आशा आहे; परंतु ‘आप’चा चेहरा समजल्या जाणाऱ्या अंजली दमानिया व मयंक गांधी या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने, प्रचाराची धुरा कुणाकडे सोपवावी, या संभ्रमात आम आदमी पक्ष आहे. दमानिया व गांधी या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची किती जाण आहे, असाही प्रश्न राज्यातील ‘आप’ समर्थकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे उपस्थित केला.
विदर्भात ‘आप’ची जोरात तयारी
विदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  पक्षाने विविध सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जवळ केले आहे. आतापर्यंत एकटय़ा नागपूर शहरात १ लाख २० सदस्य नोंदणी करण्यात आली  आहे.  विदर्भात १० ते १२ लाख सदस्य नोंदणी झाल्याची दावा केला आहे. ‘आप’ने नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला आणि भंडारा या  मतदार संघांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अमरावती जिल्ह्य़ात ‘आप’च्या सदस्य नोंदणी अभियानाला संत गाडगेबाबा यांची जन्मभूमी असलेल्या शेंडगावातून उद्यापासून सुरुवात होणार असून येत्या १३ जानेवारीपर्यंत सर्व १४ तालुक्यांमध्ये गावोगावी फिरून सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाईल, अशी माहिती ‘आप’च्या जिल्हा सचिव भावना वासनिक यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap searching stronger faces in maharashtra state