Ahmedabad Gujarat Plane Crash Passenger List: गुजरातच्या अहमदाबादच्या विमानतळाहून लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एअर इंडियाच्या AI171 विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात २४२ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी १६९ प्रवासी भारतीय नागरिक होते. तर ५३ ब्रिटिश नागरिक होते. या प्रवाशांची संपूर्ण यादी आता समोर आली आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही विमानात उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात (७ किमी दूर) ते कोसळलं.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या तिकिटाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी समोर असून त्यातही त्यांचे नाव आहे. या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी (Boarded Passenger) समोर आली असून यामध्ये १२ व्या नंबरवर विजय रमणिकलाल रुपाणी असं नाव आहे.
एअर इंडियानं या अपघातानंतर एक्सवर प्रवाशांबाबत माहिती दिली आहे. विमानात दोन पायलट, १० क्रू सदस्य आणि २३० प्रवासी होते. अपघात होण्याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.