केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढून काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या द्रमुक पक्षातच आता फूट पडण्याची चिन्हे आहेत. द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांच्यानंतर पक्षाची धुरा कोणाकडे यावरून त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे पक्षांतर्गत कुरबुरी वाढत चालल्या आहेत. याच पाश्र्वभूमीवर करुणानिधी यांचे पुत्र एम. के. अळागिरी यांनी सोमवारपासून चेन्नईत सुरू झालेल्या पक्षाच्या विशेष कार्यकारिणीच्या बैठकीस दांडी मारल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे.
अळागिरी आणि त्यांचे बंधू एम. के. स्ट्रलिन यांच्यात करुणानिधींचा राजकीय वारसदार होण्यावरून बऱ्याच काळापासून शीतयुद्ध सुरू आहे. त्यातच अलीकडे करुणानिधी यांनी स्टॅलिन हे आपले उत्तराधिकारी असतील, असे संकेत दिले होते. त्यामुळे अळागिरी हे नाराज झाल्याचे बोलले जात आहे. गेल्याच आठवडय़ात द्रमुकने यूपीएचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर द्रमुकच्या अन्य मंत्र्यांसोबत राजीनामे न देता अळगिरी यांनी स्वतंत्रपणे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन राजीनामा सोपवला होता. आपल्याशी चर्चा न करताच यूपीएचा पाठिंबा काढून घेण्यात आल्यामुळेही अळागिरी नाराज असल्याचे समजते.
या पाश्र्वभूमीवर सोमवारपासून सुरू झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अळगिरी यांची अनुपस्थिती खटकणारी होती. अळागिरी हे सोमवारी सकाळीच विमानाने मदुराईला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आपली तब्येत ठीक नसल्याने बैठकीत अनुपस्थित राहिल्याचे त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘विशेष कार्यकारिणीत शंभरावर सदस्य आहेत. ते सर्वच जण बैठकीस हजर होते, असे नाही. माझी तब्येत ठीक नसल्याने मी जाऊ शकलो नाही,’ असे त्यांनी सांगितले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alagiri skips dmk meet cites health ground