Iran-Israel War अमेरिकेने इराणच्या अणु प्रकल्पांवर हल्ले करुन इस्रायल इराण संघर्षात उडी घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही माहिती दिली. इराणमधल्या फोर्डो नतान्झ आणि इस्फानमधल्या तीन अणु प्रकल्पांवर आम्ही हल्ले केले आहेत. हे हल्ले अचूक लक्ष्यभेद करणारे होते. अमेरिकेची सगळी विमानं आता इराणच्या हवाई हद्दीच्या बाहेर आहेत. या आशयाची पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यानंतर त्यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा इराणला इशारा दिला आहे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

इराण मागच्या चाळीस वर्षांपासून अमेरिकेच्या विरोधात कारवाया करतो आहे आणि कुरापती काढतो आहे. त्यामुळे आम्हाला इराणकडे असलेले अणु प्रकल्प उद्ध्वस्त करायचे होतेच. आता या असल्या कुरापती अमेरिकेला नको आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांचे अणु प्रकल्प उद्ध्वस्त केले. आता इराणने शांत बसावं. तसं झालं नाही तर इराणला भीषण विनाशाला सामोरं जावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावं असा इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. इराणने आता शांतता प्रस्थापित केली नाही तर यापेक्षाही भीषण हल्ले आगामी काळात होतील त्याचे जे परिणाम होतील त्याला सर्वस्वी इराण जबाबदार असेल असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

“आम्ही इराणचे तीन अणु प्रकल्प अचूक लक्ष्यभेद करुन उद्ध्वस्त केले आहेत. आता इराणने शांत बसावं. शांतता प्रस्थापित न झाल्यास पुढचे हल्ले आणखी भीषण असतील. शांतता प्रस्थापित करा किंवा विनाशाला सामोरे जा असे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत”

डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

हवाई हल्ल्यानंतर इराणने काय म्हटलंंय?

इराणच्या सरकारी इरणा वृत्तसंस्थेने रविवारी पहाटे, देशातील फोर्डो अणुऊर्जा केंद्रावर हल्ला झाल्याची कबुली दिली आहे. इस्फहान आणि नतान्झ अणुऊर्जा केंद्रांनाही या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले, असल्याचे त्यात म्हटले आहे. इस्फहानचे सुरक्षा प्रभारी अकबर सालेही यांनी सांगितले की, या केंद्रांभोवती हल्ले झाले आहेत. पण त्यांनी तपशीलवार माहिती दिली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर नेतान्याहू काय म्हणाले?

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं की, “इराणवर हवाई हल्ला करण्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मी अनेकदा म्हणतो की शांतता हवी आहे. इतिहासात नोंद होईल की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवटीला आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्रांना नाकारण्याचं काम केलं. त्यांच्या नेतृत्वाने आज इतिहासाचा एक केंद्रबिंदू निर्माण केला आहे, जो मध्य पूर्व आणि त्यापलीकडे समृद्धी आणि शांतीच्या भविष्याकडे नेण्यास मदत करू शकतो”, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.