लखनऊ : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारीचा कथित साथीदार संजीव माहेश्वरी जीवा याची बुधवारी लखनऊ न्यायालय संकुलात गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबारात दोन जण जखमी झाले. हल्लेखोर वकिलाच्या वेशात आला होता, त्याला घटनास्थळीच पकडल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लखनऊ पोलीस आयुक्त एस. बी. शिरोडकर यांनी सांगितले, की लखनऊ कारागृहात असलेल्या ४८ वर्षीय जीवाला एका खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणले होते. तो मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी होता आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील नंतर राजकारणात आलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी टोळीचा सदस्य होता. त्याच्यावर भाजप आमदार कृष्णानंद राय आणि तत्कालीन मंत्री ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येचा आरोप होता. तसेच खून, फसवणूक, गुन्हेगारी कट आदी २४ गुन्हे त्याच्यावर दाखल होते.

या गोळीबारात दोन वर्षीय बालिका आणि पोलीस शिपाई जखमी झाले. त्यांना रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. यापैकी बालिकेची प्रकृती गंभीर आहे. पोलीस शिपायाची प्रकृती स्थिर आहे. १० फेब्रुवारी १९९७ रोजी ब्रह्मदत्त तिवारींची त्यांच्या अंगरक्षकासह फारुकाबाद जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी १७ जुलै २००३ रोजी सत्र न्यायालयाने जीवाला दोषी ठरवून, जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. न्यायालयात झालेल्या या गोळीबार व हत्येनंतर वकिलांनी पोलिसांविरुद्ध निदर्शने केली. कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी पोलिसांचा निषेध केला. तसेच तातडीने कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्याची मागणी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangster sanjeev maheshwari jeeva shot dead in lucknow court zws