इंग्लंडचे युवराज विलियम यांची पत्नी केट मिडलटन गरोदर असल्याची तसेच तिच्या तब्येतीची माहिती, ऑस्ट्रेलियाच्या रेडिओ प्रतिनिधींना अजाणतेपणी देणाऱ्या भारतीय वंशाच्या परिचारिकेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. जेसिंथा सालडान्हा असे मृत परिचारिकेचे नाव असून ती ४६ वर्षांची होती. किंग एडवर्ड (सातवे) मेमोरियल रुग्णालयापासून काही अंतरावर तिचा मृतदेह मिळाला.
रुग्णालयाने जेसिंथा हिचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, आपल्या चार वर्षांच्या सेवाकाळात जेसिंथाने उत्तम शुश्रुषेद्वारे सह कर्मचाऱ्यांच्या आणि रुग्णांच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले होते, असे सांगितले. या घटनेमुळे आपल्याला अतीव दुख झाले असून जेसिंथा युवराज पत्नी केट यांची उत्तम काळजी घेत होत्या, असे युवराजांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
बुधवारी पहाटे पाच वाजता मेल ग्रेग आणि मायकेल ख्रिश्चन या ऑस्ट्रेलिया रेडिओच्या प्रतिनिधींनी रुग्णालयात फोन करून आपण इंग्लंडची राणी आणि युवराज चार्लस् बोलत असल्याचे सांगितले. जेसिंथाने निरागसतेने तो फोन अन्य परिचारिकेकडे दिला आणि केट हिची तब्येत बरी नसल्याचे वृत्त पसरले होते. त्यामुळे या प्रकरणात तिचा काहीही दोष नसून एका खटय़ाळपणाचा ती बळी ठरल्याची भावना तिच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान तिच्या मृत्यूचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही.आत्महत्या असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian origin nurse duped in kate prank call is found dead