वृत्तसंस्था, गाझा, जेरुसलेम
इस्रायल आणि हमासदरम्यान शस्त्रविरामाचा कालावधी वाढवण्याबरोबरच अधिक ओलीस आणि कैद्यांची सुटका करण्यावर सहमती झाली आहे. नव्याने झालेल्या समझोत्यानुसार हा शस्त्रविराम बुधवापर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, त्याला आणखी मुदतवाढ मिळावी यासाठी कतार प्रयत्नशील आहे. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळाली नाही तर मात्र युद्ध पुन्हा सुरू होण्याची तलवार कायम आहे.
शस्त्रविरामाला मुदतवाढ मिळाली तर हमासच्या ताब्यातील आणखी ओलीस आणि पॅलेस्टाईनच्या ताब्यातील आणखी कैद्यांची सुटका होण्याची आशा पल्लवित झाली आहे. तसेच युद्धामुळे होणारी संपत्ती व जीवितहानी टाळता येऊ शकेल.
सोमवारी रात्री हमासने सुटका केलेले ११ इस्रायली स्त्रिया आणि मुले मायदेशी दाखल झाले. तर इस्रायलने सोडले ३३ पॅलेस्टिनी कैदी मंगळवारी पहाटे पूर्व जेरुसलेम आणि पश्चिम किनारपट्टीतील रामल्ला येथे पोहोचले. ओलिसांच्या आणि कैद्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या त्यांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांनी त्यांचे प्रेमभराने आणि भावुकतेने स्वागत केले. तसेच त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांनी आरोळय़ा मारून आपला आनंद व्यक्त केला.
हेही वाचा >>>तेलंगणमध्ये प्रचार थंडावला, पाच राज्यांमध्ये रविवारी मतमोजणी
हमासच्या ताब्यातील ओलिसांच्या सुटकेसाठी अधिक वेळ मिळावा यासाठी शस्त्रविराम वाढवण्यात यावा यासाठी कतारचे प्रयत्न सुरू आहेत. हमासने सुटका केलेल्या प्रत्येक अतिरिक्त १० ओलिसांसाठी एक दिवस शस्त्रविराम वाढवण्याचे इस्रायलने मान्य केले आहे. हीच बाब लक्षात घेऊन कतार पुढील मुदतवाढीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
दुसरीकडे, अमेरिकेने दक्षिण गाझामध्ये लष्करी कारवाई करताना नागरिकांचे स्थलांतर टाळण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन पुन्हा एकदा इस्रायलला भेट देऊन शांततेसाठी प्रयत्न करणार आहेत.
दरम्यान, गाझा पट्टीमधील आरोग्य यंत्रणा पूर्ववत झाली नाही तर तिथे युद्धापेक्षा अधिक जीवितहानी उद्भवणाऱ्या रोगराईमुळे होईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी दिला.