जेएनयूतील घोषणाबाजी प्रकरणी आणखी ८ विद्यार्थी दोषी असल्याचा पोलिसांना निष्कर्ष

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अफजल गुरूच्या फाशीविरोधातील कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्याकुमार याच्यासह इतर आठ विद्यार्थ्यांविरोधात विद्यापीठाच्या चौकशी अहवालात पुरावे आहेत, असे दिल्ली पोलिसांना दिसून आले आहे. दिल्ली पोलिसांनी विद्यापीठाच्याच अहवालातील तपशिलाचा आधार घेत अहवाल तयार केला आहे, पण दिल्ली पोलिसांना घोषणाबाजी नेमकी कुणी केली हे सांगण्यात अपयश आले असून एकही साक्षीदार उभा करता आलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना काल अहवालाची देवाण-घेवाण करण्यास सांगितले होते. त्यानुसार विद्यापीठाचा चौकशी अहवाल पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांना त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस किंवा विद्यापीठ कर्मचारी यांच्यापैकी कुणीही  साक्षीदार सापडलेला नाही. आयुक्त कार्यालयाला पाठवलेल्या अहवालात पोलिसांनी म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पोलीस विद्यापीठात जाऊ शकत नाहीत. अहवालात विद्यार्थ्यांनी दिलेल्या २९ घोषणांचा समावेश असून त्यात पाकिस्तान झिंदाबाद या घोषणेचा समावेश नाही त्याचा उल्लेख प्राथमिक माहिती अहवालात आहे. एका वृत्तवाहिनीच्या दृश्यफितीवरून हा प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला होता. स्थितीदर्शक अहवालातही या घोषणेचा उल्लेख आहे. हा अहवाल कन्हैय्याकुमारच्या अटकेनंतर तयार केलेला होता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अंतर्गत समितीने दिलेल्या अहवालानुसार आठ विद्यार्थ्यांविरोधात परवानगी नाकारली असताना जबरदस्तीने कार्यक्रम घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणे व घटनाबाह्य़ घोषणा देणे याबाबत पुरावे आहेत. पोलिसांनी म्हटल्यानुसार दोन गट घोषणाबाजी करीत होते, पण त्यात नेमके कोण सामील होते हे सांगण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnu issue university of evidence report