पीटीआय, चंडीगड, दिब्रुगड : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या अटक करण्यात आलेल्या सदस्यांना रविवारी आसाममधील दिब्रुगड येथे आणण्यात आले असून, कट्टर धर्मोपदेशक अमृतपाल व त्याच्या सहकाऱ्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरूच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 मोबाइल इंटरनेट व लघुसंदेश सेवांवरील स्थगितीची मुदत पंजाब सरकारने सोमवार दुपापर्यंत वाढवली असून, सुरक्षादलांनी अमृतसर, जालंधर व लुधियानास राज्यातील अनेक ठिकाणी ध्वजसंचलन केले. यापूर्वी या सेवा रविवारी दुपारपर्यंत स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. ‘पंजाबमध्ये अटक करण्यात आलेल्या अमृतपालच्या साथीदारांना विशेष विमानाने आणण्यात आले असून दिब्रुगडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे’, असे एका पोलीस अधिकाऱ्याने  सांगितले. फरार असलेल्या अमृतपाल सिंगला लवकरच अटक केली जाईल, असेही तो म्हणाला.

 पंजाब सरकारने शनिवारी अमृतपालविरुद्ध धडक कारवाई हाती घेत, त्याच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या ७८ सदस्यांना अटक केली होती. मात्र अमृतपालने पोलिसांच्या हातावर तुरी दिली. त्यांनी जालंधर येथे अमृतपालचा ताफा अडवला असताना तो पोलिसांच्या तावडीतून निसटला. यानंतर अधिकाऱ्यांनी पंजाबमधील अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे.

अमृतपालविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याखाली नवा गुन्हा

चंडीगड :  अवैध शस्त्रे बाळगल्याबद्दल फरार धर्मोपदेशक अमृतपाल सिंग व त्याच्या काही सहकाऱ्यांविरुद्ध नव्याने प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. अमृतपालच्या सात साथीदारांना शस्त्रास्त्र कायद्याच्या तरतुदींखाली अटक करण्यात आल्याची माहिती अमृतसर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सितदर सिंग यांनी दिली. ‘शनिवारी रात्री आम्ही शस्त्रविषयक कायद्याखाली नवा एफआयआर नोंदवला असून त्यात अमृतपाल हा प्रमुख आरोपी आहे. सर्व सातही जण या नव्या एफआयआरमध्येही आरोपी आहेत’, असे सिंग यांनी अमृतसरमध्ये पत्रकारांना सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khalistan supporter amritpal still absconding arrested supporters in dibrugarh jail ysh