लग्न आणि मुलांच्या संगोपनासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. लग्न हे केवळ शारीरिक सुख मिळवण्यासाठी केलं जात नाही. तर त्याचा मुख्य उद्देश संतान उत्पत्ती हा असतो, असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. लग्न संस्थेच्या माध्यमातून कौटुंबिक विस्तार होतो. लग्नानंतर जन्माल आलेली संतती ही पती आणि पत्नीला जोडणारा महत्त्वाचा दुवा असतो, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांनी एका वकील जोडप्यामध्ये मुलाच्या कस्टडीवरुन सुरु असणाऱ्या वादासंदर्भातील न्यायालयीन सुनावणीदरम्यान ही विधानं केली आहेत. पती-पत्नी म्हणून तुमचं नातं संपुष्टात येऊ शकतं. मात्र आई-वडील म्हणून तुमचं मुलांसोबत असणारं नातं संपुष्टात येणार नाही. वेगळं झाल्यानंतर आई-वडिलांनी अन्य व्यक्तीसोबत पुन्हा लग्न केलं तरी प्रत्येक मुलासाठी त्याचे आई-वडील हे शाश्वत असतात, असं न्या. रामस्वामी यांनी म्हटल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

या प्रकरणामध्ये पत्नीने न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेत तिचा वकील पती तिला मुलाला भेटू देत नसल्याचं म्हटलं होतं. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं पती उल्लंघन करत असल्याचा आरोप या माहिलेने केला होता. या महिलेने आपल्या पतीवर पॅरेंटल एलिएनेशनचा आरोप केला होता. एका पालकाने आपल्या पाल्याला दुसऱ्या पालकाविरोधात (आपल्या जोडीदाराविरोधात) चिथावणी देण्याची प्रकरणं या एलिएनेशच्या प्रकरणांमध्ये येतात. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्या. रामास्वामी यांनी विवाहसंस्थेसंदर्भात आपली मतं व्यक्त केली.

पॅरेंटल एलिएनेशन हे मानवी मुल्यांच्या विरोधात आणि मुलासाठी धोकादायक असल्याचं सांगत न्या. रामास्वामी यांनी, मुलाच्या मनामध्ये एखाद्या पालकाच्याविरोधात द्वेषभाव निर्माण करणे हे त्याला स्वत:विरोधात करण्यासारखा प्रकार आहे. लहान मुलांना जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आणि सज्ञान होईपर्यंत आई आणि वडील या दोघांच्या आधाराची गरज असते असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

न्या. रामास्वामी यांनी आई-वडिलांविरोधातील द्वेष ही भावना मुलांमध्ये स्वाभाविकपणे निर्माण होत नाही. एखाद्या व्यक्तीकडून द्वेष करण्यासंदर्भातील शिकवण दिली जात नाही तोपर्यंत मुलांच्या मनात ही भावना निर्माण होत नाही. मुलांचा पूर्णपणे ज्या व्यक्तीवर विश्वास असेल तिच्याकडून शिकवण देण्यात आल्यास मुलांच्या मनात द्वेष भावना निर्माण होते, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. ज्या पालकाकडे मुलांचा ताबा आहे त्याला आपल्या विभक्त जोडीदाराबद्दल मुलांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करता येत नसेल तर हा पॅरेंटल एलिएनेशनचा प्रकार आहे, असं न्या. रामास्वामी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage not just for carnal pleasure but to procreate madras high court scsg