कीव्ह : रशियाने सोमवारी युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. युक्रेनच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार रोस्तिस्लाव स्मिरनोव्ह यांनी सांगितले, की कीव्हमधील हल्ल्यात किमान आठ जण ठार झाले असून, २४ जण जखमी झाले आहेत. यापूर्वी जूनमध्ये कीव्हमध्ये हल्ला झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी ‘टेलिग्राम’वर म्हटले आहे, की रशिया  पृथ्वीवरून आमचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

कीव्हच्या महापौरांनी त्यांच्या युक्रेनच्या नागरिकांना या संकटकाळाला तोंड देण्यासाठी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. विटाली क्लिचको यांनी या हल्ल्यांची माहिती दिली. कीव्हच्या मध्यवर्ती भागातील शेवचेन्को परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत, तेथे अनेक स्फोट झाले आहेत. 

कीव्हच्या आपत्कालीन सेवांच्या प्रवक्त्या स्वेतलाना वोदोलागा यांनी सांगितले, की या स्फोटांमुळे जीवितहानी झाली आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक निवासी भाग व ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. खारकीव्हचे महापौर इहोर तेरेखोव्ह म्हणाले, की खारकीव्हवर तीन वेळा हल्ला करण्यात आला. वीज-पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

पुलावरील स्फोटामागे युक्रेनचा हात : पुतिन

रशियाने शनिवारी झोपोरीझिया येथे सहा क्षेपणास्त्रे डागली. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला आठ महिने पूर्ण होणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आपल्या सुरक्षा परिषदेची बैठक घेणार होते. त्याआधी हे हल्ले करण्यात आले. तत्पूर्वी, पुतिन यांनी आरोप केला की, रशियाला क्रिमियाशी जोडणाऱ्या पुलावर रविवारी झालेला हल्ला हा युक्रेनच्या विशेष सेवांनी केलेले ‘दहशतवादी कृत्य’ आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia attacks several cities including the capital of ukraine kiev amy