फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आलेला आणि पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेला भारतीय कैदी सरबजितसिंग याने पाकिस्तानातील जनता आणि अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्याकडे नव्याने दयेची याचना केली आहे.
पाकिस्तानातील जनता आणि झरदारी यांना सरबजितसिंगने संयुक्तपणे विनंती केली असून ती विनंती झरदारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहे, असे सरबजितसिंगचे वकील अवैस हुसेन यांनी सांगितले.
सरबजितसिंग हा कोट लखपत कारागृहात खितपत पडला असून गुरुवारी आपण त्याची भेट घेतली आणि त्याला आपले ‘सरबजितसिंग : अ केस ऑफ मिस्टेकन आयडेण्टिटी’ हे पुस्तक भेट केले, असे हुसेन यांनी सांगितले.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात १९९० मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सरबजितसिंगला दोषी ठरविण्यात आले आहे. या स्फोटात १४ जण ठार झाले होते. पाकिस्तानातील न्यायालयांनी आणि माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी त्याचे दयेचे अर्ज फेटाळले होते. पाकिस्तान पीपल्स पार्टीने सरबजितसिंगच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी २००८ मध्येच बेमुदत कालावधीसाठी रद्द केली होती. अनवधानाने सरबजितसिंग पाकिस्तान हद्दीत गेला, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३० पाकिस्तानी मच्छीमारांना अटक
कच्छ – सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ३० पाकिस्तानी मच्छीमारांना गुजरातच्या कच्छ भागात शुक्रवारी अटक केली. काही पाकिस्तानी मच्छीमार भारतीय समुद्राच्या हद्दीत घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. या सर्वाना त्यांच्या होडय़ांसह कच्छ जिल्ह्य़ातील पडाळा खाडीनजिक ताब्यात घेण्यात आले. या सर्वाना कोटेश्वर येथे नेण्यात येईल व पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारताच्या कैदेत सध्या शेकडो पाकिस्तानी मच्छीमार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarabjitsing again filled mercy petition