महिला कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठांवर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उबर कंपनीचे सीईओ ट्रॅव्हिस कॅलनिक यांनी अचानकपणे सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यांनी काही दिवसांसाठी कंपनीचा कारभार आपल्या टीमकडे सोपवला आहे. आपण सुट्टीवरून कधी परतणार, हेदेखील त्यांनी निश्चितपणे सांगितलेले नाही. काही दिवसांपूर्वीच एका अपघातात ट्रॅव्हिस यांच्या आईचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून आपल्याला सावरण्यासाठी वेळ हवाय. तसेच माझ्या नेतृत्त्व गुणांमध्ये आणखी सुधारण करण्यासाठी आपण सुट्टीवर जात असल्याचे ट्रॅव्हिस यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनी मंगळवारी कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहलेल्या एका संदेशात याबद्दलची माहिती दिली. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे मला कामापेक्षा घरी अधिक लक्ष देण्याची गरज वाटू लागली आहे. माझ्या आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरायलाही मला वेळ लागेल. तसेच मला चिंतन आणि आत्मपरीक्षणासाठी वेळ हवा आहे. उबर २.० यशस्वी होण्यासाठी मला एक चांगली टीम तयार करायची आहे. त्यासाठी मला वेळ देत मेहनत करायची आहे. पण उबर २.० यशस्वी व्हायची असेल तर मला ट्रँव्हिस २.० वरही मेहनत घ्यावी लागेल, असे ट्रॅव्हिस यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी महाधिवक्ता एरिक होल्डर यांनी उबर कंपनीतील बिघडलेले वातावरण सुधारण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या होत्या. यामध्ये त्यांनी ट्रॅव्हिस यांच्या नेतृत्त्वाविषयी शंका उपस्थित करत त्यांना काही जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्याची गरज व्यक्त केली होती. कंपनीतील सीओओ पदावरील व्यक्तींकडे आणि  अन्य काही व्यवस्थापकांकडे हा कार्यभार सोपवण्यात यावा, असे होल्डर यांनी म्हटले होते. तसेच उबरने कर्मचाऱ्यांच्या तक्रारींना योग्य प्रतिसाद देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून वरिष्ठ व्यवस्थापकांना जबाबदार धरणारी मूल्यमापन पद्धती अंमलात आणावी, असेही होल्डर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uber ceo travis kalanick to take leave of absence amid investigations over toxic work culture scandals