मेट्रो मार्ग आणि वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे एक हनुमान मंदिर दिल्लीत जमीनदोस्त करण्यात आले आहे. परंतु, हे मंदिर जमीनदोस्त करण्याआधी पाडकामासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. आरती केली आणि त्यानंतरच मंदिर पाडकामाचे काम हाती घेतले. यासंदर्भातील व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर पूर्व दिल्लीतील भजनपुरा परिसरात एक हनुमान मंदिर आणि मजार हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी अतिक्रमण विरोधी मोहिम राबवली. यादरम्यान अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस आणि केंद्रीय बलांनाही तैनात करण्यात आले होते. तसंच, ड्रोन कॅमेराने संपूर्ण परिसराची देखरेख सुरू होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या भागात डबल डेकर फ्लायओव्हर बांधण्याचे काम सुरू आहे. यावरून मेट्रो रुट आणि खाली रस्ता तयार बांधण्यात येत आहे. परंतु, रस्त्याच्या मधोमध असलेल्या मजार आणि किनाऱ्यावर असलेल्या एका हनुमान मंदिरामुळे येथे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मंदिर आणि मजार हटवले जावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती.

सीलमपूर एसडीएम शरत कुमार यांनी सांगितलं की, “सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिर हटवण्यासाठी मंदिर प्रशासनाला नोटीस पाठवली होती. परंतु, त्यांनी मंदिर हटवले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला पाडकाम कारवाई करावी लागली.”

अतिरिक्त पोलीस उपआयुक्तांनी सांगितलं की, “रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी मजार आणि मंदिर शांततेत हटवण्यात आले आहे. मजार आणि मंदिर लोकांच्या श्रद्धेचा विषय असतो, त्यामुळे याच्या पाडकामासाठी विरोध झाला होता. परंतु, विकासकामांसाठी ही कारवाई होत असल्याने लोकांची समजूत काढण्यात आली. त्यामुळे त्यांनीच या मंदिरातील मूर्ती बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसंच, या कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाली नाही.”

आपचा कठोर विरोध

दरम्यान, दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी यावरून उपराज्यपाल वी. के. सक्सेना यांच्यावर टीका केली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी उपराज्यपालांना पत्र लिहित म्हटलं की, LG साहेब, मी काही दिवसांपूर्वीच तुम्हाला पत्राद्वारे विनंती केली होती धार्मिक स्थळांविरोधात सुरू असलेली कारवाई थांबली पाहिजे. परंतु, आज पुन्हा तुमच्या आदेशाने भजनपुरा येथील एक मंदिर तोडण्यात आले आहे. माझे तुम्हाला पुन्हा निवेदन आहे की, दिल्लीतील मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे तोडली जाऊ नयेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video first performed pooja took darshan then police razed hanuman temple sgk