तिहेरी प्रबळ दाव्यामुळे लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीत अखेर सत्ताधारी राष्ट्रवादीतून माधवी गवंडी यांनी बाजी मारली. महापौर निवडीसाठी गवंडी यांचा एकमेव अर्ज अखेरच्या दिवशी शुक्रवारी दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट  झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरोधी भाजप—ताराराणी आघाडीने महापौर पदासाठी अर्ज दाखल न केल्याने गवंडी यांची मंगळवारी (२ जुलै) होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडीची केवळ अनौपचारिकता उरली आहे. संधी डावलली गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष राजू लाटकर आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिकेत गोंधळ घातला.

कोल्हापूर महापालिकेचे महापौरपद या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. हे पद  मिळावे अशी मागणी अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, माधवी गवंडी व अनुराधा खेडकर यांनी  केली होती. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत मुश्रीफ आणि माजी महापौर सरिता मोरे यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. तर, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्या पत्नी अ‍ॅड. लाटकर यांना उमेदवारी देऊ  नये, असे पत्र पक्षाच्या वरिष्ठांना पाठविले होते.

यामुळे या निवडीला चांगलाच रंग आला होता. अखेर या नाटय़मय घडामोडीनंतर गवंडी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी भाजप—ताराराणी आघाडीने महापौर पदासाठी अर्ज दाखल न केल्याने गवंडी यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट  झाले.

महापौर निवडीसाठी एकमेव अर्ज आज सादर झाल्यानंतर माधवी गवंडी यांनी पतीसह विजयाची खूण  दाखवली.

(छाया-राज मकानदार)

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur mayor madhavi gawandi fixed