तिरंदाज अतानू दासची भूमिका
क्रिकेट, फुटबॉल, टेनिस सगळेजण खेळतात. बहुसंख्यजण जो मार्ग पत्करतात, तोच पकडून वाटचाल करण्यात गंमत नाही. वेगळी वाट धुंडाळण्यात थरार आहे. प्रत्येक क्षणी संघर्ष आहे. म्हणूनच तिरंदाजी खेळ निवडला, असे मत युवा तिरंदाजपटू अतानू दासने व्यक्त केले. नेरुळ येथील डी. वाय. पाटील क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ‘स्पोर्ट्स फॉर ऑल’ उपक्रमात शालेय तिरंदाजी स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या अतानूने आपल्या खेळनिवडीचे रहस्य उलगडले.
‘‘समवयस्क मंडळींनी मुख्य प्रवाहातील खेळ निवडले. मात्र दुर्लक्षित अशा तिरंदाजीने खुणावले. याव्यतिरिक्त तिरंदाजी ऑलिम्पिक खेळ आहे. हा खेळ निवडला तर क्रीडाविश्वातल्या सर्वोच्च व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करता येईल, या विचाराने तिरंदाजीची निवड केली,’’ असे त्याने प्रामाणिकपणे सांगितले. २४ वर्षीय अतानूच्या नावावर तिरंदाजी विश्वचषकात ४ तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ३ पदके आहेत.
तरुणांमध्ये लोकप्रिय अशी केशरचना, टी-शर्ट आणि जीन्स असा पेहराव, ब्रँडेड घडय़ाळ, दोन्ही हातांवर टॅटू, मोबाइलमध्ये मग्न अतानू सध्याच्या युवा पिढीचे मूर्तिमंत प्रतीक आहे. मात्र तिरंदाजीसारख्या खर्चीक खेळासाठी आईवडिलांनी सोसलेले दिवस त्याला अजूनही लक्षात आहेत. धनुष्य आणि बाण यांची एकत्रित किंमत लाखभर रुपये होते. मध्यमवर्गीय कुटुंबाला ही रक्कम प्रचंड आहे. परंतु आईवडिलांनी कर्ज काढून निधी जमवला. यामुळेच मी तिरंदाजीची आवड जोपासू शकलो, असे अतानू अभिमानाने सांगतो.
‘‘सुरुवातीला मित्रमंडळी, नातेवाईक, ओळखीची माणसे थट्टा करत असतात. ‘चाललाय अर्जुन बनायला’ अशी रेवडी उडवत असत. मात्र आईवडील भक्कमपणे पाठीशी उभे होते. कोलकातामध्ये एका छोटय़ाशा क्लबमध्ये तिरंदाजीच्या मूलभूत गोष्टी शिकलो. सबज्युनियर गटात बक्षिसे मिळवू लागलो. तिरंदाज घडवण्यासाठी जमशेदपूर येथील टाटा अकादमी प्रसिद्ध आहे. अकादमीच्या चाचणी परीक्षेत मला नाकारण्यात आले. याच अकादमीच्या तिरंदाजांना हरवून इथे प्रवेश मिळवेन असा निग्रह केला आणि वर्षभरातच अकादमीसाठी निवड झाली,’’ असे अतानू अभिमानाने सांगतो.
पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकवारीचा अनुभव खूप काही शिकवणारा होता, असे अतानूने सांगितले. ऑलिम्पिकसाठी कोटा मंगलसिंग चांपिआने मिळवला होता. मात्र भारतीय तिरंदाजी संघटनेने बंगळुरूत आयोजित निवडचाचणीद्वारे अतानूची निवड केली. मंगलसिंगला डावलून अतानूला प्राधान्य देण्यात आल्याने तेढ निर्माण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याविषयी विचारले असता अतानू म्हणाला, ‘‘जो निर्णय झाला तो नियमांनुसार घेण्यात आला. त्याची सगळ्यांना कल्पना होती. मंगल आणि माझ्यात कोणतेही वैर नाही. हा अत्यंत व्यवसायिक निर्णय होता. लक्ष्यभेद भाग असणाऱ्या खेळांमध्ये अनिश्चितता प्रचंड प्रमाणावर असते. ऑलिम्पिकसाठी चार वर्षे तयारी चालते. खेळाडूच्या कारकीर्दीत चढउतार येतात. पडत्या काळात सर्वाधिक पाठिंबा आवश्यक असतो. मात्र घडते उलटेच, हीच खंत आहे.’’