भारताचा सलामीवीर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धडाकेबाज शतक झळकावत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. पण या सामन्यात भारताल पराभव पत्करावा लागला. पण असे पहिल्यांदा घडलेले नाही. रोहितच्या गेल्या तीन शतकांच्या वेळी भारताला विजय मिळवता आलेला नाही. याबाबत रोहित म्हणाला की, ‘‘शतकाने नक्कीच प्रत्येक फलंदाजांना आनंद मिळत असतो. पण माझ्यामते शतकापेक्षा विजय मिळवणे महत्त्वाचे असते.’’
या सामन्यात रोहितने नाबाद १७१ धावांची खेळी साकारली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताला ३०९ धावा करता आल्या होत्या.
‘‘ या मालिकेची सुरुवात सकारात्मक झाली आहे. शतक झळकावल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला आहे. पण हा सामना जिंकू न शकल्याने मी निराश आहे. तुम्ही किती धावा करता हे महत्त्वाचे नसते तर तुम्ही सामना कसे जिंकता हे महत्वाचे असते. या सामन्यात नेमके काय चुकले, यावर आम्हाला लक्ष देण्याची गरजोहे,’’ असे रोहित म्हणाला.
या शतकी खेळीबाबत रोहित म्हणाला की, ‘‘ संघाच्या बैठकीमध्ये एका फलंदाजाने तरी खेळपट्टीवर तग धरून राहावे, असे सांगितले जाते. मी या सामन्यात तेच केले. खेळपट्टीवर स्थिरस्थावर झाल्यावर मोठे फटके मारता येतात आणि संघाच्या धावसंख्येला चांगला आकार देता येतो. हाच प्रयत्न मी या सामन्यात केला.’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important to win than a century says rohit sharma