विराटच्या बेंगळूरुचा आज श्रेयसच्या दिल्लीशी सामना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुबई : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) प्रारंभीच्या तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला अखेर सूर गवसला आहे. परंतु बेंगळूरुची खरी कसोटी सोमवारी श्रेयस अय्यरच्या बलाढय़ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लागणार आहे. गुणतालिके त प्रत्येकी सहा गुणांसह पहिल्या दोन स्थानांवर असलेल्या या संघांमधील आघाडीसाठीची झुंज रंगतदार ठरेल अशी अपेक्षा आहे.

विराटने ५३ चेंडूंत नाबाद ७२ धावांची धडाकेबाज खेळी साकारल्याने बेंगळूरुने राजस्थान रॉयल्सला आठ गडी राखून धूळ चारली. दिल्लीचा श्रेयस मात्र सातत्याने धावा करीत आहे. शनिवारी श्रेयस (नाबाद ८८ धावा) आणि पृथ्वी शॉ (६६) यांच्या फलंदाजीमुळे दिल्लीने कोलकाता नाइट रायडर्सला १८ धावांनी नामोहरम के ले. त्यामुळे बेंगळूरु-दिल्ली लढतीत आघाडीवर राहून नेतृत्व करणाऱ्या विराट-श्रेयसची जुगलबंदी पाहायला मिळेल.

दिल्लीची फलंदाजी जरी स्थिरावली असली, तरी सलामीवीर शिखर धवन अजूनही धावांसाठी झगडतो आहे, हीच श्रेयसची प्रमुख चिंता आहे. पण कोलकाताविरुद्ध ऋषभ पंतला (३८) गवसलेला सूर श्रेयससाठी दिलासादायक आहे. याशिवाय मार्कस स्टॉइनिस आणि शिम्रॉन हेटमायरसारखे फलंदाजही त्यांच्याकडे आहेत.

गोलंदाजीत कॅगिसो रबाडा कोलकाताविरुद्ध महागडा ठरला होता. आनरिख नॉर्किए टिच्चून गोलंदाजी करतो आहे.

बेंगळूरुच्या फलंदाजीची धुरा युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल समर्थपणे सांभाळत आहे. देवदत्ताने चार सामन्यांत तीन अर्धशतकांसह एकू ण १७४ धावा के ल्या आहेत. त्याला आरोन फिन्चची साथ मिळाल्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांपुढे आव्हान ठरत आहे. त्यानंतर विराट, एबी डीव्हिलियर्स, शिवम दुबे आणि गुरकिराट सिंग अशी तगडी फलंदाजीची फळी बेंगळूरुकडे आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ सिलेक्ट

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 preview royal challengers bangalore take on delhi capitals zws