करोनाच्या साथीमुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराला यंदा सलग दुसऱ्या वर्षी फटका बसला आहे. गतवर्षीप्रमाणेच (२०१९-२०) यंदाही (२०२०-२१) शिवछत्रपती पुरस्कार दिले जाणार नाहीत. परंतु करोनातून सावरत क्रीडा स्पर्धा सुरळीत सुरू झाल्यानंतर पुढील वर्षीपासून हे पुरस्कार नियमितपणे दिले जातील, असे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी गुरुवारी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९६९-७०पासून राज्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गेल्या काही वर्षांत १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिनाचा मुहूर्त साधून हे पुरस्कार देण्याची प्रथा राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली होती. २०२०मध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे २२ फेब्रुवारीला झालेल्या शानदार कार्यक्रमात ६३ जणांना २०१८-१९च्या पुरस्काराने गौरवण्यात आले, परंतु गेली दोन वर्षे करोनाच्या साथीमुळे राज्यातील क्रीडा स्पर्धावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे या वर्षीही पुरस्कार लांबणीवर पडल्याचे केदार यांनी सांगितले.

राज्य शासनाकडून शिवजयंतीचा मुहूर्त बऱ्याचदा चुकवला जातो. २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ हे तीन वर्षांचे प्रलंबित पुरस्कार एकत्रितपणे देण्यात आले होते. मात्र त्यानंतर २०१७-१८ आणि २०१८-१९च्या शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण करताना अनुक्रमे विनोद तावडे आणि केदार या राज्याच्या क्रीडामंत्र्यांनी शिवजयंतीचा मुहूर्त साधला होता, परंतु या प्रथेत करोनामुळे दोनदा खंड पडला आहे.

करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा गेली दोन वर्षे क्रीडा स्पर्धावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळेच यंदाही शिवछत्रपती पुरस्काराचा कार्यक्रम होऊ शकणार नाही. परंतु करोनाची साथ आता नियंत्रणात येत आहे. लवकरच क्रीडा स्पर्धाही राज्यात सुरळीतपणे सुरू होतील. त्यामुळे पुढील वर्षी फेब्रुवारीत हे प्रतिष्ठेचे पुरस्कार निश्चितपणे दिले जातील.

—सुनील केदार,  राज्याचे क्रीडामंत्री

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivchhatrapati award is not available this year either abn