नामांकित खेळाडूंचा गाजावाजा न करता मूलभूत खेळाच्या बळावर भरारी घेणारा न्यूझीलंड आणि जागतिक स्पर्धांमध्ये नेहमीच बेधडक वृत्तीसह निर्विवाद वर्चस्व गाजवणारा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी कोण रविवारी प्रथमच ट्वेन्टी-२० जेतेपदावर नाव कोरणार, याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. ४४ सामने आणि २७ दिवसांच्या खेळानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडत आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊयात दोन्ही संघांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड काय सांगतो…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टी-२० मधील आतापर्यंतचा रेकॉर्ड काय –

टी-२० मधील रेकॉर्डची तुलना करता ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर वर्चस्व राखलं आहे. टी-२० मध्ये दोन्ही संघ आतापर्यंत १४ वेळा आमने-सामने आले आहेत. यामधील नऊ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून पाच सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता.

टी-२० वर्ल्ड कपमधील रेकॉर्ड-

टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकच सामना झाला आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकत रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे.

न्यूझीलंडने आतापर्यंत वेगवेगळ्या स्थितींमध्ये दाखवलेला संयम आणि खेळी पाहता तेच वर्ल्डकपचे विजेते ठरतील असं क्रिकेटप्रेमींना वाटत आहे. पहिल्या सहा ओव्हर्समध्ये फटके लगावल्यानंतर मधल्या ओव्हर्समध्ये परिस्थितीनुसार खेळ आणि नंतर शेवटला पुन्हा एकदा गोलंदाजांवर तुटून पडणं अशी न्यूझीलंडची रणनीती आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचं गेल्यास डेव्हिड वॉर्नरला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये सूर गवसला असून अंतिम सामन्यातही त्याच्याकडून चांगली खेळी पहायला मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ अद्याप मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

वॉर्नर, वेडपासून धोका

संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक २३६ धावा करणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानविरुद्ध सामन्याला कलाटणी देणारा मॅथ्यू वेड यांना मोक्याच्या क्षणी सूर गवसल्याने न्यूझीलंडला सावध राहावे लागेल. मात्र फिंच, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल या अनुभवी त्रिमूर्तीला अद्यापही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसवर अतिरिक्त दडपण येत आहे.

झॅम्पा प्रमुख अस्त्रा

ऑस्ट्रेलियाच्या वाटचालीत मनगटी फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाने (१२ बळी) सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याला मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड या वेगवान त्रिकुटाची योग्य साथ लाभत आहे. त्याशिवाय उपांत्य लढतीचा सामना दुबईतच खेळल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना खेळपट्टीचा नूर ओळखणे सोयीचे ठरू शकते.

कॉन्वेची माघार, मिचेलवर भिस्त

न्यूझीलंडला जागतिक कसोटी अजिंक्यपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉन्वे हाताच्या दुखापतीमुळे अंतिम लढतीला मुकणार आहे. कॉन्वेच्या माघारीमुळे सलामीवीर डॅरेल मिचेलवरील (१९७) जबाबदारी अधिक वाढली आहे. विल्यम्सन, गप्टिल यांना कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात पटाईत असलेला जिमी नीशाम हुकुमी एक्का ठरू शकतो.

गोलंदाजांचे पंचक लयीत

ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, अ‍ॅडम मिल्ने या वेगवान त्रयीसह इश सोधी आणि मिचेल सँटनर ही फिरकी जोडी न्यूझीलंडच्या संघाची ताकद आहे. विशेषत: बोल्टने संघासाठी सर्वाधिक ११ बळी मिळवले असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंड २०१५च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा घेण्यासाठी उत्सुक असेल.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, स्टार स्पोटर्स १ हिंदी, स्टार स्पोटर्स सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc final new zealand vs australia head to head record in t20 world cup and t20i sgy