पीटीआय, नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा एका वृत्तवाहिनीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दुखापतीनंतर पूर्ण तंदुरुस्त नसतानाही मैदानावर पुनरागमन करण्यासाठी काही भारतीय क्रिकेटपटू विशिष्ट ‘इंजेक्शन’ घेत असल्याचा गौप्यस्फोट शर्मा यांनी केला आहे. तसेच विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या वर्तवणुकीवरही त्यांनी भाष्य केले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पराभव झाला होता. त्यानंतर ‘बीसीसीआय’ने शर्मा यांच्यासह संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी केली होती. मात्र, निवड समितीची पुनर्रचना करताना पुन्हा शर्मा यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वृत्तवाहिनीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये शर्मा यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कोहली यांच्यातील अंतर्गत चर्चेचाही खुलासा केला.

पूर्ण तंदुरुस्त नसतानाही भारतीय खेळाडू स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी विशिष्ट ‘इंजेक्शन’चा वापर करतात. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत बुमराच्या समावेशावरून संघ व्यवस्थापन आणि बुमरा यांच्यात मतभेद झाले होते. तेव्हापासून बुमरा अजूनही संघाबाहेर आहे, असे शर्मा म्हणाले. माजी कर्णधार कोहली आणि ‘बीसीसीआय’चा माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यातही वाद होता, असे शर्मा यांनी म्हटले आहे.

हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतर ‘बीसीसीआय’ने यात लक्ष घातल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ‘‘निवड समिती ही ‘बीसीसीआय’शी करारबद्ध आहे. त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलता येत नाही. आता चेतन शर्माचे भविष्य काय असेल, याबाबतचा अंतिम निर्णय सचिव जय शहा घेतील. त्याचबरोबर शर्मा यांनी केलेली विधाने पाहून रोहित शर्मा आणि ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पंडय़ा हे निवड समितीच्या पुढील बैठकांमध्ये उपस्थित राहण्यास नकार देतील का, याचाही विचार करावा लागेल,’’ असेही ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of injection by indian cricketers for fitness selection committee chairman chetan sharma sting operation ysh