Benefits of Aloe Vera Gel on Face Overnight : उन्हाळ्यात आपण डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून सनग्लासेस, केस खराब होऊ नयेत म्हणून स्कार्फ, तसेच त्वचा टॅन होऊ नये म्हणून फुल स्लीव्हचे कपडे घालतो. त्यामुळे उन्हाळ्यात आपण इतर गोष्टींची काळजी घेत असताना चेहऱ्याकडे लक्ष देणे विसरून जातो. त्यामुळे अनेकदा चेहरा चमकदार दिसण्यासाठी आपल्यातील अनेक जण नाईट क्रीमचा वापर करतात. नाईट क्रीम त्वचेला मॉइश्चरायझ करते, ज्यामुळे त्वचा गुळगुळीत होते. पण, बाजारात वेगवेगळ्या ब्रँडच्या नाईट क्रीम दिसतात. या नाईट क्रीममध्ये अनेक प्रकारची रसायने असतात, जी त्वचेलाही हानी पोहोचवतात.
तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अशा परिस्थितीत नक्की चेहऱ्याला लावायचे तरी काय? त्यावर एक सुरक्षित पर्याय म्हणजे ‘अॅलोवेरा जेल’. अॅलोवेरा जेल नैसर्गिक आहे, ज्यामुळे त्वचेवर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच, उन्हाळ्यात याचा वापर करणे फायदेशीर ठरते. तर उन्हाळ्यात रात्री झोपताना अॅलोवेरा जेलचा वापर केल्याने काय होते याबद्दल जाणून घेऊया…
नाईट क्रीम म्हणून अॅलोवेरा जेल वापरण्याचे फायदे (Benefits Of Using Aloe Vera Gel As night cream) :
१. त्वचा हायड्रेटेड दिसते (Hydrated Skin) – उन्हाळ्यात, त्वचेला हायड्रेट ठेवणे हे देखील खूप महत्वाचे आहे. झोपण्यापूर्वी चेहऱ्याला अॅलोवेरा जेल लावल्याने त्वचेला हायड्रेशन मिळते. त्यामुळे त्वचा मॉइश्चराइझ राहते आणि दुसऱ्या दिवशी चमकदार दिसते.
२. त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते (Soft and Smooth Skin) – अॅलोवेरा जेल त्वचेला मऊ आणि गुळगुळीत ठेवण्यास देखील मदत करते. जेव्हा आपण रात्री झोपताना अॅलोवेरा जेल लावतो तेव्हा त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी राहते. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो, ज्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत होऊ लागते.
३. त्वचा चमकणारी दिसते (Glowing Skin) – उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे त्वचेचा निस्तेजपणा वाढतो. त्यामुळे काळे डाग आणि टॅनिंग देखील होऊ लागते. या समस्या त्वचेची चमक कमी करतात. पण, झोपण्यापूर्वी अॅलोवेरा जेल लावून तुम्ही त्वचेची हरवलेली चमक परत आणू शकता. त्यात हायड्रेटिंग गुणधर्म आहेत जे त्वचेला उजळण्यास मदत करू शकतात.
४. मुरुमे कमी करण्यास मदत (Reduce Acne) – उन्हाळ्यात त्वचेवर घाम आणि तेल वाढल्यामुळे मुरुमे देखील येऊ लागतात. या समस्यांवर अॅलोवेरा जेल रामबाण उपाय ठरतो. अॅलोवेरा जेलमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. हे त्वचेतील बॅक्टेरिया नियंत्रित करतात आणि संसर्गाचा धोका कमी करतात, ज्यामुळे मुरुमांच्या समस्येला प्रतिबंध होतो.
५. सुरकुत्या कमी करण्यास मदत (Reduce Wrinkles) – अॅलोवेरा जेल चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझ राहते, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा टाळता येतात. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
नाईट क्रीमऐवजी अॅलोवेरा जेल देखील वापरले जाऊ शकते. अॅलोवेरा जेल त्वचेशी संबंधित समस्यांसाठी म्हणजे काळे डाग, त्वचेचा निस्तेजपणा कमी होण्यास, नवीन त्वचेच्या पेशी तयार करण्यास मदत करतात .