अंजली कुलकर्णी
मलिका अमर शेख हे मराठी स्त्रीवादी कवितेतील प्रथम नाव आहे. १९७९ साली आलेला मलिका यांचा ‘वाळूचा प्रियकर’ हा कवितासंग्रह म्हणजे १९७५ साली सुरू झालेल्या स्त्रीवादी चळवळीचा पहिला मराठी काव्यात्म उद्गार. या संग्रहात मलिका यांनी स्त्री म्हणून जाणवणाऱ्या वैयक्तिक आणि सार्वत्रिक पातळीवरील स्त्रीजीवनाच्या कोंडीवर, घुसमटीवर भाष्य करून विद्रोहाचा एक धारदार सूर उमटवला होता. मलिका यांच्या कवितेच्या रूपाने व्यवस्थेचा दबाव आणि त्यातून उद्भवणारे स्त्रीदु:ख यांच्यातील अटळ नात्याचे अचूक आकलन त्यांच्या कवितेत लख्खपणे पहिल्यांदा उमटले. त्यानंतरच्या ‘देहऋतु’ आणि ‘महानगर’ या संग्रहांतूनही मलिका यांची विद्रोही ओळख घट्ट झाली. त्यानंतर २००७ साली आलेल्या ‘माणूसपणाचे भिंग बदलल्यावर’ या संग्रहात मलिका यांच्या कवितेचा सूर व्यापक जीवनानुभवांतून आलेल्या विस्तारित शहाणिवेचा होता. या कविता स्त्रीपणाबरोबरच समग्र माणूसपणाविषयी बोलताना दिसतात. नुकत्याच आलेल्या ‘भीषण गर्म हवा’ या संग्रहातील कवितांमधून त्यांनी ‘स्व’च्या जगण्यापासून मानवी समूहाच्या जगण्यापर्यंतचा एक सजग शोध घेतला आहे. एक स्त्री, एक माणूस, एक कवी म्हणून समग्र जगण्याकडे बघण्याचे ‘भिंग’ या कवयित्रीला लाभले असल्याचा सुंदर प्रत्यय या कविता देतात. वयाबरोबर निबर न होणारी कोवळी संवेदनशीलता मलिका यांना लाभली आहे. ‘वाळूचा प्रियकर’ची संवेदनशीलता आणि ‘भीषण गर्म हवा’मधील संवेदनशीलता यांची प्रत थक्क करणारी आहे. ही वयातीत संवेदनशीलता आणि जगण्यातून मिळालेली विस्तारित समज यांतून ‘भीषण गर्म हवा’ या संग्रहातील कवितांचा विस्मयचकित करणारा आविष्कार समोर आला आहे. ‘कित्ती कित्ती पारदर्शी झालंय हे शरीर/ की कवितेतला शब्द न् शब्द त्वचेवर उमटतोय/ न वाचता येतंय अस्खलित’ (‘साऱ्या कविता’) अशी ती अत्युच्च कोटीची संवेदनशीलता आहे.
‘भीषण गर्म हवा’ हे या संग्रहाचे शीर्षक वर्तमान परिस्थितीचे अचूक निर्देशन करणारे आहे. ‘आपण कवी आहोत ही गोष्ट भयप्रद वाटू लागलीय / आपण जिवंत आहोत ही गोष्ट / जाहीर करायची का लपवायची, हेही समजेनासं झालंय’ (‘कवी’) अशी एक सार्वत्रिक संभ्रमाची आणि भीतीची ‘भीषण गर्म हवा’ सगळीकडे दाटून आल्याची संवेदना या कवितांमध्ये आहे. ‘एका शहरामध्ये एका दंगलीत / हजार माणसं मेली, तितकीच जखमी झाली / तर प्रत्येक घरात जळून मरणाऱ्या बायका किती?’ (‘गणित’) असे सर्वत्र हिंसात्मक झालेल्या वर्तमान परिस्थितीचे उपरोधिक गणित त्या मांडतात, तेव्हा त्यातील हताशा संवेदनांना भेदून जाते.
या संग्रहातील कवितांमध्ये भोवतालाविषयीची काव्यात्म प्रतिक्रिया निश्चितपणे आहे; परंतु कवयित्रीच्या संवेदनांचा रोख आता नेणिवेकडे अधिक वळलेला दिसतो. स्वत:च्या आंतरिक विश्वात सुरू असलेल्या अनेक अनाकलनीय घडामोडींची कित्येक वेळा आपल्याला जाणीवही नसते. नेणिवेतील त्या संवेदनांच्या उत्खननातून ‘स्व’चा शोध घेण्याची एक उत्कट आकांक्षा या कवितांमधून जाणवते. जीवनाच्या ज्या टप्प्यावर कवितागत ‘मी’ आता उभी आहे, तिथून जगलेले वैयक्तिक आणि सार्वत्रिक आयुष्य न्याहाळण्याची आणि त्याचे अन्वय शोधण्याची वृत्ती या कवितांनी धारण केली असल्याचे लक्षात येते. उदा. ‘मेंदूच्या आत आत’ या कवितेत ज्ञान, विचार, नीतिकल्पना आणि या सर्वावर हावी होणारी आदिम वासना यांच्यातील आदिबंधाचे धागे उलगडले आहेत. ‘जगातलं सारं काही / मेंदूच्या आत जावं / ही कोण धडपड साऱ्यांची / आता मेंदूच्या आतपर्यंत गेलेली प्रत्येक गोष्ट / मेंदूतल्या बाया धुऊनपुसून / गायब करून टाकतात..’ मेंदूच्या उत्खननातून गवसलेले सत्याचे एक-एक निके रूप या कवितांमधून त्या प्रतिमांकित भाषेत मांडतात. या कवितांमध्ये व्यक्ती ते समष्टी असा होणारा अनुभवांचा प्रवास अभ्यासण्याजोगा आहे. उदा. ‘प्रिय बाळा’ आणि ‘माझ्या प्रिय बाळा’ या दोन्ही कवितांमधील उद्गार एकीकडे वैयक्तिक, तर दुसरीकडे समग्रपणे पुढच्या पिढीच्या चिंताजनक भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे करतात. ‘त्यांनी बक्षीस म्हणून तिघांना / एक-एक नरक दिला / प्रत्येकाला स्वतंत्र ’ (‘प्रिय बाळा’) अशा शब्दांत कवयित्री मलिका व्यक्त होतात तेव्हा वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आपल्या मुलांच्या भविष्याविषयीची कुरतडणारी भीती सरसरून जागी होते.
सभोवतालाविषयी मलिका यांची कविता फार तीक्ष्ण, तरीही करुणामय शब्दांत व्यक्त होते. ‘बकरी’ या कवितेत मंत्र्याच्या जेवणासाठी रोज खालमानेनं निमूट कत्तलखान्याची वाट चालणाऱ्या बकऱ्यांच्या प्रतिमेमधून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या बेहाल जिण्याची वेदना मुखर केली आहे. तर ‘भूक’ या कवितेत ‘भूक माणसाला जिवंत ठेवते / की ठेचून मारते, हेच ठरवता नाही येत’ अशी भुकेच्या आगडोंबाइतकीच तीव्र जाणीव त्या व्यक्त करतात.
मलिका यांच्या या संग्रहातील कवितांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातील उत्कट प्रेमानुभव, वैयक्तिक जीवनातील एकाकीपण, तुटलेपण, स्त्रीदु:खाची व्यापक जाणीव, भोवतालातील टोचणाऱ्या, बोचणाऱ्या वास्तवाचे विविध पदर आणि हे सगळे मिळून समोर येणारे, एका असीम करुणेने संपृक्त, समग्र जीवनाचे विराट, तरीही कोवळे दर्शन या कविता घडवतात. उदा. ‘बायका या जगातल्या’ या कवितेत बायकांच्या जिवट आणि चिवट, तगून राहण्याच्या वृत्तीवर भाष्य करताना मलिका म्हणतात, ‘बायका जगतात / अलबत जगतात बुडणाऱ्या गलबतातसुद्धा..’ किंवा ‘खोड’ या अफलातून कवितेत ‘त्यांना मला संपवण्याची सवय झाली / न पुन्हा पुन्हा जन्मायची खोड माझी / मेली तरी नाही गेली’ – या कवितेत एकाच वेळी प्रतिमा आणि श्लेषसाधक शब्द म्हणून केलेली ‘खोड’ या शब्दाची योजना अभिनव आहे. तर ‘मांजर’ या कवितेत मांजरीच्या प्रतिमेतून पाळीव प्राण्याप्रमाणे नवऱ्याच्या सावलीच्या सुखात राहणाऱ्या स्त्रियांसंदर्भात उपरोधिक उद्गार त्यांनी काढला आहे. परंतु या सगळ्याच्या चार अंगुळे वर शिल्लक राहते ते मलिका अमर शेख या व्यक्तिमत्त्वात शिगोशिग भरून राहिलेले प्रेम! जगण्याविषयी, जीवनाविषयी, माणसे आणि इथल्या सुंदर निसर्गाविषयी.. अगदी मृत्यूविषयीचेदेखील अतोनात प्रेम ज्या धडकत्या हृदयात अगदी पुरेपूर भरलेले आहे अशा जिवंत, सजग हृदयाची स्पंदने म्हणजे या कविता आहेत. एका रसरशीत जीवनासक्तीचा आणि प्रेमभावनेचा उत्कट, तरल आविष्कार घडवणाऱ्या, विलक्षण प्रत्ययकारी प्रतिमांतून बोलणाऱ्या या कविता मलिका अमर शेख या कवयित्रीच्या ‘वाळूचा प्रियकर’पासून सुरू झालेल्या आणि आजही टवटवीत, अम्लान राहिलेल्या प्रतिभेच्या प्रवासाची सुंदर साक्ष देतात.
‘भीषण गर्म हवा ’- मलिका अमर शेख,
मैत्री पब्लिकेशन, पाने- १४०, किंमत- २०० रुपये.