‘भाषेच्या खऱ्या वैभवासाठी..’ हा भूषण कोरगांवकर यांचा लेख मराठी भाषा सर्व स्तरांवर रुळण्यासाठी काय करायला नको हे समर्पक भाषेत सोदाहरण सांगणारा आहे. मुलांना मराठीचं बाळकडू मिळण्यासाठी मराठी शाळांत घाला, हा टाहो फोडूनही काही परिणाम झालेला दिसत नाही. उलट पुरेशा विद्यार्थिसंख्येअभावी अनेक मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत हे खेदकारक आहे. महापालिकेच्या मराठी शाळांतून शिक्षण घेऊन झालेले प्रथितयश साहित्यिक, डॉक्टर, उद्योजक, अभियंते यांची खूप उदाहरणं महाराष्ट्रात सापडतील. ते झालं महाराष्ट्रापुरतं.
पुढे जगभरात शिक्षण, उद्योगात टिकायला इंग्रजीचाच टेकू हवा हेच सर्व पालकांच्या डोक्यात बसलंय. काही अंशी ते खरं असेलही; पण सगळेच पाल्य महाराष्ट्र सोडून जातील असं नाही ना? मग मराठीशी प्रतारणा का? आता तर सरकारी आस्थापना, न्यायालयातही स्थानिक भाषेत पक्षकारांना निकालपत्र देण्याची सक्ती केली जाऊ शकते, असं सर्वोच्च न्यायालयच सांगतं. मग अडलंय कुठे, हा विचार करून मराठी राजभाषा करण्याआधी निदान प्रमाण व बोलीभाषा म्हणून तरी रुळण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील साहित्यिक, भाषतज्ज्ञ, शिक्षक, प्राध्यापक यांच्या मदतीनं केले गेले पाहिजेत.
माझ्या मेव्हण्याचा मुलगा अमेरिकेत जन्माला आला आणि तिकडचाच झाला; पण त्याचे आई-वडील अन् दरवर्षी सहा महिने वास्तव्यास त्यांच्याकडे जाणाऱ्या त्याच्या आजी (माझ्या सासूबाई) यांच्याशी तो व्यवस्थित मराठीत (अडला तर आजी आहेच) बोलू शकतो. इकडे आला की आम्हा साऱ्या नातेवाईकांशी मराठीत संवाद साधू शकतो. आपणच मराठी बोलण्याच्या बाबतीत आग्रही राहायला हवे. केवळ साहित्य संमेलनापुरतं मराठीला डोक्यावर घेतलं नाही, मराठी शिक्षणाला नाकं मुरडली नाही तरच ‘माझ्या मराठीची गोडी’. नाही तर ‘मराठीचं वैभव पाहू शकणार का आपलीच पुढची पिढी?’ – श्रीपाद पु. कुलकर्णी