शरणकुमार लिंबाळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशवंत मनोहर हे मराठी साहित्यातील एक ज्येष्ठ कवी. ‘उत्थानगुंफा’ संग्रहाचे विद्रोही कवी म्हणून त्यांची ओळख आजही टिकून आहे. त्यांनी विपुल गद्य लेखन केलं असलं तरी त्यांचे नाव कवी म्हणूनच सर्वाना ज्ञात आहे. त्यांचा ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यातील कविता वाचताना माणसाचे कुठल्याही पातळीवरचे अवमूल्यन सहन न करणारी ही कविता आहे याची प्रचीती येते. मनोहरांच्या कवितेमध्ये गद्य-काव्याची अतुलनीय आरास विखुरलेली दिसून येते. त्यांच्या सर्व कवितांच्या शैलीत आणि रूपामध्ये कमालीचे साम्य भासते. फौजेच्या कवायतीसारख्या त्या तालबद्ध व लयबद्ध आहेत. संपूर्ण संग्रह अदम्य उत्साह, आक्रमक आवेश आणि जिंकण्याच्या ऊर्जेने शिगोशिग भरलेला आहे. या कवितांमध्ये ओघवत्या विधानांची आकर्षक आतषबाजी जशी दिसून येते तशीच तरल चिंतनाची खोलवर भिडणारी आचही जाणवते.

या संग्रहातील शोषणसत्ताक, विषम समाजव्यवस्था आणि तिचा मूलभूत आधार असलेल्या वैचारिकतेचा पाया खणून काढणाऱ्या कविता वाचताना मनावर ताण येतो. वाचक या कवितेचा सहप्रवासी होतो.

‘हे असेच सुरू राहिले

तर नियम मोडणाऱ्या

लेखकांचे हात तोडण्याची

फर्माने निघतील

हे असेच सुरू राहिले तर

हुबेहूब माणसाप्रमाणे दिसणाऱ्या

प्रेतांचा समाज निर्माण होईल’

मनोहरांची कविता समकाळाशी संवाद साधणारी आहे. आजचा भग्न आणि भयावह चेहरा दाखवणारी ही कविता सर्वहारांच्या अजिंक्यतेची ग्वाही देते. धर्माध सत्तेचे रक्तरंजित वर्तमान, करोनाने निर्माण केलेले भयावह अगतिक वास्तव आणि महिलांवरील क्रूर अत्याचार याचा हिशेब विचारणारी ही कविता आहे. या पीडितांना कोणी वाली नाही, आपणच त्यांचे कर्तेकरविते आहोत अशी भूमिका घेऊन या कविता लिहिल्या गेल्या आहेत. या कवितांमध्ये कवीच्या मनातला प्रक्षोभ स्फोटासारखा व्यक्त झाला आहे.

‘हजारो वर्षांच्या तुरुंगावर

निर्णायक हल्ला करणारा

पहिला हातोडाही कवीचाच आहे’

आपण बंडखोर आहोत, क्रांतिकारक आहोत आणि समग्र समाजाला समतेच्या छत्राखाली आणणारी एकमेव ऊर्जा आपणच आहोत अशी कवीची भूमिका आहे. विषमतेविरुद्ध युद्ध छेडणे, छळछावण्यांविरुद्ध बंड करणे, अस्वस्थ मनाच्या उद्रेकाला ऊर्जा देणे आणि क्रांतीची स्वप्ने पाहत ही कविता लिहिली गेली आहे. ती रौद्र भाषा बोलत संघर्षांची पेरणी करताना दिसते. ही कविता जितकी शोषितांची आहे, त्याहीपेक्षा अधिक कवीच्या मनातील तीव्र संतापाची अभिव्यक्ती आहे. अनेकदा ही कविता शब्दबंबाळ रूप धारण करते. विधाने व प्रश्नांचा वापर करून कवीने आपल्या मनातील तप्त भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. यातल्या कविता ईहवादाने प्रेरित आहेत. सामान्य माणसाच्या उजेडाने प्रज्ज्वलित झालेल्या आहेत.

‘युद्धात लढत नसते आपली ताकद

लढत नसतात शस्त्रे हातातली

लढतात निष्ठा धारदार’

मनोहरांच्या कवितांमध्ये निसर्गही डोकावतो. तो कवीच्या स्वप्नांची प्रतिमा म्हणून प्रकटतो. कवितेत भोवताल खचाखच भरलेला आहे. समुद्र, नदी, पाऊस, ढग, वारा, वादळ, भरती, ओहोटी, किनारा, बेट, उगवणे, मावळणे, काळोख, अंधार, उजेड, पावसाळा, पहाट, पंख, झाडे, चंद्र, सूर्य, आकाश, पौर्णिमा हे अनेक कवितांमध्ये प्रत्यही येतात. तरीही या कविता उथळ नाहीत. कवीच्या शैलीने त्यांना विलोभनीय कंगोरे प्राप्त झाले आहेत. मनोहरांची शब्दांवर हुकूमत आहे. निसर्ग आणि समाज यांचं अभिन्न रौद्र रूप म्हणजे मनोहरांची कविता होय. माणूसपणा हा या कवितेचा प्राण आहे.

‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ संग्रहात अनेक दीर्घकविता आहेत. या दीर्घकविता म्हणजे जणू कवीचे स्वगत आहे. त्यांत कवीचे चिंतन आणि प्रगल्भ जाणिवेचे प्रत्यंतर येते. त्या मनोहरांच्या प्रतिभेची जणू शिल्पेच आहेत. कवी त्यांतून आपले जीवनभाष्य प्रकट करतो. मनोहरांच्या दीर्घकवितेसारख्या धारदार आणि ओघवत्या कविता अन्यत्र वाचायला मिळणे कठीणच. कवीची खरी ताकद या कवितांमधून प्रकट होते. काही कवितांमध्ये नामदेव ढसाळांच्या ‘माणसाने’ ही कविता डोकावताना जाणवते. हा कवी किती अस्वस्थ आणि स्फोटक रसायन घेऊन जगतो आहे याची प्रचीती ही कविता वाचताना येते..

‘हे रक्ताचे पाटच वाहत आहेत

आता ओसंडून.

रक्तात भिजला नाही

असा शब्द कोठून आणू मी

माझ्या कवितेसाठी’

‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’मधील कविता वेदना आणि विद्रोहाने लगडलेली आहे. या कवितेतून कवीची न्याय आणि समतेवरील आस्था आणि निष्ठा स्पष्ट होते. त्या ठसठसलेल्या आणि रसरसलेल्या दग्ध भावनांची अनुभूती देतात. म्हणूनच कवीचा तीव्र संताप समजून घेण्यासाठी अगोदर समाजातले दैन्य, दास्य समजून घेणे गरजेचे होते. मनोहर हे मराठीतले एक महत्त्वाचे कवी आहेत. त्यांच्या कविता वाचताना निर्माण झालेली अपेक्षा आणि उत्सुकता हा संग्रह पूर्ण करतो. विद्रोहाबरोबरच सर्जनाचे सौंदर्य या कवितेमध्ये प्रकट झालेले आहे. या कवीला त्याच्याच शब्दांत शुभेच्छा देणे उचित होईल..

‘मला येत आहेत नवे कोंब

कोसळण्याचा भयंकर आवाज ऐकतानाही

मला येत आहेत नव्या हिरव्या फांद्या

दाटून आलेल्या अंधारातही

आणि नवे निरोपही येत आहेत पर्यायाचे.’ 

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pustak parikshan author sharankumar limbale incomparable decoration poetry ysh