शिरीष चिंधडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेष्ठ गुणवत्तेची कविता वाचणं म्हणजे मर्मबंधांचा गुंता उकलणं असतं. तिच्या अभिव्यक्तीच्या लकबी, शैलीची सामथ्र्ये, पुनरावर्ती विषयांचा आणि अनुभवांचा, प्रतिमा-प्रतीकांचा विलास यांचा मागोवा घेताना बुद्धी, भावना, कल्पनाशक्ती आणि एकूण कविता- वाचनाच्या संदर्भाची चौकट, उपलब्ध भाष्यकारांचे विवेचन, या सर्वाना आवाहन करावे लागते. दिलीप धोंडगे यांच्या ‘अनाहत’ संग्रहातली कविता वाचताना द्यावा लागणारा हा प्रतिसाद आहे.
‘अनाहत’मध्ये ‘अविगत’, ‘आहत’ आणि ‘अनहद’ या तीन उपविभागांत मिळून अर्धशतकभर कविता आहेत. अनाहत हा गुप्त स्वरूपात गुंजणारा अंत:स्वर असतो. तो इथे कवितेच्या देहरूपाने प्रगटला आहे. प्रारंभीच्या ‘सर्जत राही’, ‘शोधतो मी’, ‘ऋतू बदल’, ‘भोगवटा’ आणि ‘कमळण’ या पंचकात अनुभूतींचे, आविष्काराचे आणि शैलीवैशिष्टय़ांचे पुनरावर्तन आढळत असल्याने, त्या कविता एकूण समग्र संग्रहाचे नमुनेदार पुरोभूमीकरण आहे असे म्हणता येईल. या आविष्कारात प्रतिमाप्रातुर्य आढळते. कविता भग्न प्रतिमांच्या ढिगाऱ्यासारखी असते. त्या भग्न -ब्रोकन- असल्याने त्यात तर्कसंगती शोधणे अनावश्यक ठरते.

त्या दृष्टीने निद्रा, आकाश, अंधार, चांदण्या आणि अव्याहतपणे परिवर्तित होणारे ऋतुचक्र, या प्रतिमांची नोंद घ्यायला हवी. इथे आहे चाळवलेली अस्वस्थ निद्रा. अबोध -अनाहत- जाणिवांचा खेळ अंतरंगात, अबोध मनात अव्याहतपणे सुरू आहे. प्रसंगी त्यात अनामिक भीतीदेखील गोठलेली आहे, भयगंडावस्था आहे (‘छत कोसळते आहे’). असे असूनही त्यात रतीच्या अनुभूतीचे म्हणजे सृजनाचे स्पष्ट संकेतदेखील आहेत, ही विशेष स्वरूपाची विजिगीषू वृत्ती दिसते. सृजनाचा चमत्कार असा की दात विचकणाऱ्या, जाळणाऱ्या चांदण्या अलगदपणे हृदयाच्या तालावर अंगाईदेखील गातात! ही सृजनोर्मी परिपूर्ण होते ती पहाट झोपेत साखरपेरणी करूनच. सृजनाचे हे रमणीय नृत्यनाटय़ या एकूण कवितेचा अंत:स्वर आहे. पानझडीनंतर पानफुटी येणे हा नियम असल्याने सारे क्षण समाधानरूप होतात. त्या प्रकाशात ‘हातांसाठी’ ही कवितादेखील वाचता येईल. हात हे विश्वातल्या सृजनक्षमतेचे मूलाधार. प्रार्थना करण्यात गुंतलेल्या हातांपेक्षा निर्मितीत गुंतलेले हात अधिक मौल्यवान असतात. कवीचे हात असे असतात. कवितेत लोहारकामाचे रूपक वापरलेले आहे. ‘कधि करित मृदुल, कधि कठिण प्रहार’ असे घाव घालून अवजार तर तयार झाले. आता ते दुसऱ्या हातांची प्रतीक्षा करत खोळंबले आहेत. ‘आता औजार/ कर्तव्योन्मुख पडलंय/ हातांसाठी.’ असे सृजनाचे डोहाळे लागलेले हात दुर्मीळच.

काही अनोख्या प्रतिमा कवितेतून प्रगटतात. गाभाऱ्यातल्या पणतीसारखी ठसठसणारी जखम, ही बेहद्द अपारंपरिक प्रतिमा आहे (‘नित्य’). चित्र आणि प्रत्यक्ष यांतली सरमिसळ, दोन्हींत मिसळलेले नि:शब्द दु:ख, पडद्यावरची सुकी खपली आणि त्याखालची ओली खाच/ जखम.. अशी ही उलगाउलग आहे. पडदा म्हटले की साहचर्य नियमानुसार त्यावर चित्र आले, रंग आले, कदाचित शब्ददेखील आले. पण ब्रशचे कितीही जोरकस फटकारे मारले तरीही चित्र निरवयव, अमूर्तच राहते. सृजनोर्मी परिपूर्ण देहरूप धारण करू शकतच नाही, ही अपूर्णतेची व्याकुळता कविताभर ठसठसते. ही झिंग, हे नाटय़ ‘मी अभावात’देखील व्यक्तलेले आहे. ‘मोर’ कवितेत हे अमिट असोशीपण आहे. हीच अस्वस्थता हिरवंकंच लुसलुशीत यौवनधुंद पान आणि नंतर गळून पडणारे म्हातारलेले, जराजर्जर पिवळट पान यांसारख्या प्रतिमांतून प्रगटते (‘भर दुपारी’). त्यातून एकत्र नांदणाऱ्या जनन-मरणाचे, चक्रनेमीक्रमाचे सत्य डोकावते. शिवपुराणाच्या कोऱ्या प्रतीचा शोध ही अशी एक पुनर्जन्म खूण आहे. ‘कस’, ‘जीवन’ आदी कविता याच रीतीने उकलणे, आकळणे शक्य आहे.

अनाहत नाद हा केंद्रगामी म्हणजे आत्मरतीदर्शक असतो, तर आहत नाद केंद्रापसारी असतो. अर्थात इथे या दोहोंमध्ये विरोध, वितुष्ट नाही, कारण जाणिवांचे केंद्र जे संवेदनशील मन, ते या अंतर्बा अशा दोन्ही स्तरांवर कार्यरत असते, दोन्हीचे सायुज्य साधते. त्यामुळे ‘आहत’ उपविभागातील कविता ‘आसपास सारे कण्हणे, कुंथणे, विव्हळणे’ हे कटूध्वनी ऐकतात, नोंदवितात, हे अपेक्षितच आहे (‘सेवा’). घंटा हवी, पण मूक कंपने वलयणारी/ नि:संदर्भ हवा संदर्भासहित/ निष्कामता हवी सकामतेला गर्भारणारी’ असे विलक्षण द्वंद-रसायन झालेले दिसते. त्यामुळेच की काय अनाहतमधल्या ‘मी’चा अलगदपणे पक्वफळापरी सहजपणाने गळणाऱ्या ‘मीपण’नुसार.. आम्ही’ होतो. त्याला भीषण भवतालाचे भयकारी भान येते, दंगलीच्या कत्तली दिसू लागतात. हा ‘आम्ही’ समष्टीनिष्ठ आहे, त्यात तुम्ही-आम्ही सगळे आलो. मग एखादे वेळी कवीचा उपरोध, क्रोध जणू पाणी दिलेल्या तलवारीसारखा दांभिकतेवर वार करतो, तेदेखील शब्दांचा फापटपसारा न मांडता अत्यल्प शब्दांत. ‘माय’ कशी तर कवितेच्या तळाशी एकाकीपणे लटकून राहिलेल्या त्या शब्दांसारखी! गाईला ‘माय’चा दर्जा देऊन तिची पूजा मांडणारे समाजातले काही दंभजर्जर महाभाग प्रत्यक्षात मात्र त्याच ‘माय’ला दूर कुठेतरी गुराढोरागत दावणीला बांधून घालतात, या समाजसत्यावर कवीने अत्यल्प शब्दांत केलेला प्रहार काळजाला भिडतो. याच वज्रकठोर तलवारीचे कुसुमकोमल मोरपीस होऊन जाते- जेव्हा एखादी सखी लग्न होऊन सासरी निघताना करुणार्त होऊन मागे वळून या दिलवाल्याकडे बघते तेव्हा (‘पहाट डोळे मिटते’). त्याच सुरात वाचकाला थक्क करणारे झाडांचे ऋतुकालोद्भव बदलते रूप-रंग-गंधांचे विलासदेखील चित्तवेध करतात (‘झाडं’, ‘एक उंच झाड’)! साहजिकच झाडांच्या देहावर चालणाऱ्या कठोर कुऱ्हाडीच्या घावांमुळे चित्त सैरभैर, दु:खीकष्टी होते. इतकेच नव्हे तर हा बहिरांगाचा धांडोळा, भवतालच्या समाजातला अर्निबध बेमूर्वतखोर चंगळवाद, शोषक वृत्ती, निर्ढावलेली स्वमग्नता यांचा देखी समाचार घेतो. त्या संदर्भचौकटीत ‘दृष्टिकोन’ ही कविता वाचता येईल.

कवीच्या जाणिवे-नेणिवेत संतशिरोमणी तुकोबा वसाहतीला आहेत. आदर्शाचे, आराध्याचे पूजन, अनुकरण मग ओघानेच येते. बहुश: मुक्तछंदात प्रगटलेल्या या संग्रहात ते अवतरते अभंगरचनेतून, अगदी काही वेळा विडंबनातूनसुद्धा. त्यात औधत्य किंवा पावित्र्यहनन मुळीच नसते, कारण विडंबन हा अभिवादनाचा, मान-मान्यतेचा आगळा अवतार मानला गेलेला आहे. ‘बुडती हे जन’ इथपासून, तर ‘नव्हे माझी वाणी पदरीची’ अशी मोकळी कबुली देऊनच कवी अभंगगान करतो. त्यातली नर्मविनोदाची खुमारी बहारीची आहे. धोंडगे यांची कविता अल्पाक्षररमणीय आहे. नामापासून क्रियापदे, अनुप्रास यांचा सढळ उपयोग कवितेत आहे.

‘अनाहत’ हा सबरंगी, इंद्रधनुषी सकस काव्यसंग्रह आहे. प्रचलित मराठी कवितेहून या कविता ‘हटके’ आहेत. दिसल्या-न-दिसल्याप्रमाणे भासणाऱ्या सुंदरीसारखी ही कविता आहे. कुठेही आक्रस्ताळेपणाचा नाही, मंचीय कंठाळी स्वर नाही, भावनांचे कढ येऊन आविष्काराचा तोल ढळलेला नाही, अशी ही घरंदाज, संयत सुंदरी आहे! हा ‘पाऱ्यासारखा अल्लद निसटणारा गुळगुळीत रुपेरी मासा’ आहे. कवितेकडून दोन घटका करमणूक अपेक्षिणाऱ्या वाचकाने त्या फंदात पडून त्रागा करणे टाळलेले बरे! संग्रहाचे अंतर्बाह्य रूप नेटके आणि गुणसमृद्ध आहे.

‘अनाहत’, -दिलीप धोंडगे, कॉपर कॉइन प्रकाशन, पाने : ८४, किमत : २९९ रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reminiscences of an unusual literature researcher prof a k priolkar amy