अहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. हत्येच्या काही दिवसांपूर्वीच वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांना हल्ल्याची कुणकुण लागली होती, अशी माहिती उघड झाली आहे. संजय कोतकर यांच्या कुटुंबीयांनी हा दावा केला असून माझ्या पतीची जशी गोळ्या घालून हत्या झाली, तसंच या प्रकरणातील दोषींनाही पोलिसांनी गोळ्या घातल्या पाहिजे, अशी मागणी कोतकर यांच्या पत्नीने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदनगरमधील केडगाव उपनगरात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व विभागप्रमुख वसंत ठुबे या दोघांची शनिवारी संध्याकाळी गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. संजय कोतकर यांच्या कुटुंबीयांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना नवीन खुलासा केला.

माझ्या पतीची हत्या झाली. या घटनेमुळे आमचं घर उद्ध्वस्त झाले असून अशी वेळ दुसऱ्यांवर ओढावू नये. या प्रकरणातील दोषींनाही पोलिसांनी गोळ्या घातल्या पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय कोतकर यांच्या पत्नीने दिली. त्या पुढे म्हणतात, माझ्या पतीला धमक्या येत होत्या. मी त्यांना फोनवर बोलताना ऐकले होते. विरोधकांची दहशत वाढल्याचे ते फोनवर बोलायचे. वसंत ठुबेनेही माझ्या पतीला विरोधकांनी हल्ल्याचा कट रचल्याचे सांगितले होते. चार जणांचा काटा काढण्याचा कट आहे, अशी माहिती वसंतने आम्हाला दिली होती, असे कोतकर यांच्या पत्नीने सांगितले. निवडणुका याआधीही झाल्या. पण असे काही घडू शकते. यावर विश्वासच बसत नाही, असे त्यांच्या पत्नीने म्हटले आहे.

पोलिसांनी हत्या करणारे व हत्येचा कट रचणारे अशा सर्वांना तुरुंगात टाकले पाहिजे. दोषींना गोळ्याच घातल्या पाहिजे. आता दुसरी घर उद्ध्वस्त होऊ नये इतकंच आम्हाला वाटते. पक्षानेही आम्हाला साथ द्यावी, बाकी आमची कोणतीही अपेक्षा नाही, असे त्यांच्या पत्नीने सांगितले.

केडगावमध्ये माझ्या वडिलांनी शिवसेना आणली. गेल्या ३० वर्षांपासून ते शिवसेनेसाठी काम करत आहेत. भानुदास कोतकर यांचा मुलगा संदीप कोतकर यांना हत्येप्रकरणी शिक्षा झाल्याने पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत शिवसैनिकांनी जोमाने प्रचार केला होता. त्या दिवशी (शनिवारी) पोटनिवडणुकीचा निकाल होता. संदीप कोतकरच्या चुलत भावाने निवडणुकीत विजय मिळवला. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. याचा बदला घेण्यासाठी माझ्या वडीलांची व वसंत ठुबेंची हत्या करण्यात आली, असा आरोप कोतकर यांच्या मुलाने केला.

माझ्यावर गोळीबार झालायं, माझं सगळं संपलंय
हल्ल्यानंतर संजय कोतकर यांनी मुलाला फोन केला होता. वडिलांसोबतचे शेवटचे संभाषण काय झाले, याची देखील त्याने माहिती दिली. तो म्हणतो, माझ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, माझं सगळं संपलंय. आता जगणं कठीण आहे असं त्यांनी सांगितले. गोळीबार कोणी केला व कोणी करायला लावला याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, कोतकर फोनवर बोलत असल्याचे लक्षात येताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांची हत्या केली, असे त्यांच्या मुलाने सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahmednagar shiv sena leader murder case pre planned attack on my husband says sanjay kotkar wife