लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्याचवेळी एनडीएमधील पक्षाच्या काही नेत्यांना मंत्री‍पद मिळाले. मात्र, यामध्ये एनडीएतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालं नाही. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या.

याबाबत खुद्द सुनेत्रा पवार यांनीही इच्छा बोलून दाखवली होती. “मला संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचे सोने करण्यासाठी मी प्रयत्न करेन”, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं होतं. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रीपदाबाबत मोठं भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद मिळणार असेल तर ते मलाच मिळेल”, असा दावा प्रफुल्ल पटेलांनी केला आहे.

हेही वाचा : “महायुतीला तडीपार करणार म्हणणाऱ्यांना…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “कोकणाने…”

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

एनडीएच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मंत्रीपद कधी मिळणार आणि कोणाला मिळणार? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर उत्तर देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय होईल. त्यामुळे आता त्याबाबत विश्लेषण करण्याची आवश्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ज्यावेळी मंत्रीपद देण्यात येईल, तेव्हा ते मलाच मिळेल”, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

दरम्यान, संसदेच अधिवेशन आता होणार आहे. त्या अधिवेशनामध्ये लोकसभेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. मात्र, आता उपाध्यक्षपद हे विरोधकांनी मागितले असल्याची चर्चा आहे. तसेच हे पद विरोधी पक्षांना मिळाले नाही तर अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची भूमिका इंडिया आघाडीने घेतली असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, “लोकशाहीमध्ये बहुमत हा एक मंत्र असतो. त्यामुळे जर तुमचे बहुमत असेल तर तुम्ही तुमचे अधिकार प्राप्त करू शकता. केंद्रात एनडीएच सरकार बनलं आहे. आता आकडेवारी शिवाय काही होत नाही. त्यामुळे लोकसभेचा अध्यक्ष निवडताना मतदान होऊद्या. मतदानामध्ये स्पष्ट होईल की बहुमत कोणाकडे आहे. आता सरकार आणि विरोधीपक्ष यांच्यात संवाद चांगला असेल तर कधी-कधी हे पद विरोधकांना देण्यात येतं. मात्र, अशी काही परंपरा नाही”, असंही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितलं.