आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात गनोजा गावात एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली. यावर आता स्वतः बच्चू कडू यांनी सौरभ इंगोले नावाच्या संबंधित कार्यकर्त्याला सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली. तसेच मारहाणीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. “बातमीच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. व्हायरल व्हिडिओचा विपर्यास केला गेला. मी मारहाण केली नाही. आमचं कार्यकर्त्यांसोबत कौटुंबिक नातं आहे,” अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बच्चू कडू म्हणाले, “गावातील एका कार्यकर्त्याने जाणीवपूर्वक पैसे घेऊन कार्यक्रम उधळून लावण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला. विरोधी पक्षातील एका कार्यकर्त्याने हे सर्व केलंय. मुद्दा इतकाच होता की रस्त्याच्या पाटीवर जो रस्ता लिहिला होता तो पाटीप्रमाणे गेला नाही. रस्ता बांधताना आपण नेहमी दोन्हीकडून काही भाग सोडून देतो आणि मध्यभागातून रस्ता बांधतो. मात्र, या गावात रस्त्याची रुंदी वाढली, त्यामुळे लांबी कमी झाली एवढा लहान विषय होता.”

“सौरभ इंगोलने गनोजा गावात खूप काम केलं. खरंतर ते माझ्यासाठीही आव्हान होतं. इतकं चांगलं काम केल्यानंतर त्याला आणि मलाही बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. व्हिडीओत मध्येच कानशिलात मारल्याचा आवाज ऐकू येतो. मात्र, मी कानशिलात मारली नाही. केवळ हात करून थांब म्हटलं आणि मी त्या कार्यकर्त्याशी बोलतो असं सांगितलं. मात्र, मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला,” असं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलं.

बच्चू कडू पुढे म्हणाले, “काही माध्यमांचं मला आश्चर्य वाटतं. मारहाण म्हणजे लाथाबुक्क्यांनी मारलं तर मारहाण झाली म्हणतात. माध्यमांनी असे प्रकार करू नये. त्याचा कार्यकर्त्यांवर वाईट परिणाम होतो. असा विपर्यास करणं चुकीचं आहे.”

“मागील २०-२५ वर्षांपासून मी कार्यकर्त्यांना जपलं आणि कार्यकर्त्यांनी मला जपलं आहे. कोणत्याही पक्षाशिवाय, दिल्ली-मुंबईतील नेत्याच्या पाठिंब्याशिवाय मी आमदार आहे,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.

काय घडल्याचा आरोप?

गणोजातील रस्त्याच्या कामावर एका कार्यकर्त्याने गंभीर आक्षेप घेतले होते. बच्चू कडू या रस्त्याचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना या कार्यकर्त्याने हे आक्षेप बच्चू कडूंसमोरही मांडले. त्यावेळी बच्चू कडूंनी ठेकेदार आणि इंजिनियरसमोरच कार्यकर्त्याची बाजू ऐकून घेतली. मात्र, ठेकेदार रस्त्याचं काम योग्य झालं म्हणत होता, तर कार्यकर्ता कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत होता.

व्हिडीओ पाहा :

रस्त्याचं काम ज्या भागासाठी मंजूर झालं होतं त्या भागात रस्ता झाला नाही, असा प्रमुख आक्षेप तक्रारकर्त्या कार्यकर्त्याने केला. तसेच ज्या भागात रस्त्याचं काम झालं नाही तो कुठे गेला असा सवाल केला. यावर बच्चू कडू संतापले आणि तू मुर्खासारखे काहीही बोलतो असं वक्तव्य केलं. त्यावर कार्यकर्त्यानेही बच्चू कडूंना प्रत्युत्तर देत मुर्खांना तुम्ही मुर्खात काढू नका, असं म्हटलं.

हेही वाचा : अकोला: राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर, जाणून घ्या नेमकं प्रकरण

यावर संतापलेल्या बच्चू कडूंनी तक्रारदार कार्यकर्त्याला तू पहिल्यांदा ऐकून घे, असं म्हटलं. अशातच गावातील प्रहारच्या एका कार्यकर्त्याने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडूंनी त्याला शांत बस असं सांगितलं. हे बोलताना बच्चू कडूंनी हात उगारल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu comment on allegations of slapping party worker in amravati rno news pbs
First published on: 28-09-2022 at 19:23 IST