माढा तालुक्यातील घटना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : प्रेमविवाहाला मुलीच्या घरातून विरोध झाल्याने नैराश्य येऊन मुलीने आत्महत्या केली. त्यापाठोपाठ मुलानेही आत्महत्येचा मार्ग पत्करला. दोघेही शिक्षित आणि एकाच जातीचे होते. आश्चर्य म्हणजे हा प्रकार घडल्यानंतर मृत मुला-मुलीच्या नातेवाईकांनी त्याची माहिती पोलिसांना न कळविताच दोन्ही मृतदेहांचा अंत्यविधी परस्पर उरकून टाकल्याची बाबही समोर आली आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसांनीही अद्याप गांभीर्याने दखल न घेता केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

आत्महत्या  केलेल्या या दोघांपैकी मुलगा औषधशास्त्राचे शिक्षण घेत होता, तर मुलीचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते.

माढा तालुक्याच्या पूर्व भागात सीना नदीकाठच्या एका गावात हा प्रकार घडला असून त्याची माढा पोलीस ठाण्यात अद्यापि नोंद झाली नाही. मुलीच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच दिवशी मुलाचाही मृत्यू झाला, हा केवळ योगायोगाचा भाग असल्याचा दावा संबंधित नातेवाइकांनी केला आहे. मुलीचा मृत्यू अचानकपणे ह्दयविकाराने झाल्याचाही दावा तिचे नातेवाईक करतात. प्रत्यक्षात अगोदर मुलीने विषप्राशन करून आत्महत्या केल्यानंतर त्याची माहिती मिळताच मुलानेही विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे  सांगितले जाते. या दोघा मुला-मुलीचा एकाच गावात आणि एकाच दिवशी काही अंतराने मृत्यू झाल्याने त्याची चर्चा माढा तालुक्यात सुरू झाली आहे.

दरम्यान, गावच्या पोलीस पाटलाने या घटनेची माहिती माढा पोलीस ठाण्यास कळविली असून त्यानुसार या घटनेची चौकशी केली जात असल्याचे माढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. खरसोडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. चौकशीअंती पुढील कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple commit suicide as parents oppose marriage zws