पंतप्रधान आवास योजना गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने आज (१७ मार्च) छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे. गैरव्यवहारप्रकरणी एक कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. पंतप्रधान आवास योजनेत ४०० कोटींपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे. एकाच व्यक्तीला सर्व प्रकारची कंत्राटं दिली असल्याचा आरोप केला जात होता. त्यावर आता कारवाई सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान आवास योजनेत गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालय या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आता कारवाईला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून संभाजीनगरात ईडीने नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीनंतर ईडीच्या हाती काय लागलं? याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

कंत्राटदाराचं घर, रुग्णालयासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी

दरम्यान, या गैरव्यहारात काही मोठे नेते सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित कंत्राटदाराचं घर, एक रुग्णालय आणि इतर ७ ठिकाणी ईडीने छापेमारी केल्याची बातमी झी २४ तासने दिली आहे. पंतप्रधान आवास योजनेत छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यावर आता ईडीने कारवाई सुरू केली आहे.

हे ही वाचा >> गँगस्टर बिश्नोईसाठी दोन अल्पवयीन बहिणी घरातून पळाल्या, झारखंडहून थेट गाठलं पंजाब, तुरुंगाबाहेर पोहोचताच…

पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची कागदपत्रे संक्तवसुली संचालनालयाने दोन आठवड्यांपूर्वी ताब्यात घेतली होती. महापालिकेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच एकाच आयपी ॲड्रेसवरून निविदा भरल्याचं देखील अलिकडेच उघडकीस आलं आहे. ४० हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यहार झाल्याचे धागेदोरे ईडीच्या हाती लागले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed raids at 9 places in sambhajinagar pm awas yojana scam asc