नवी दिल्ली येथील ‘नॅशनल इंटिग्रेशन अ‍ॅण्ड इकॉनॉमिक कौन्सिल’ यांच्या वतीने देण्यात येणारा ‘इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार’ येथील डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील श्री सत्य साई बाबा आंतरराष्ट्रीय ऑडिटोरियम केंद्रात आयोजित ‘जीवन आणि कार्य : इंदिरा गांधी’ या कार्यक्रमात पाँडेचेरीचे डॉ. इकबाल सिंग यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देऊन बिडकर यांना सन्मानित करण्यात आले. बिडकर यांनी ४५ वर्षांपासून महाराष्ट्रातील आदिवासी समाजात विविध आजारांबाबत व त्यावरील उपायांबाबत जनजागृतीचे कार्य करीत आहेत. अंधश्रद्धेपासून आदिवासी समाजाला परावृत्त केले. तसेच आजार, वंध्यत्व, व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, संस्कृती संवर्धन याविषयी जनजागृतीचे काम केले आहे. तसेच त्या नवी दिल्लीच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र सचिव आहेत. उत्तर महाराष्ट्रातील एकूण १८ मंडळांमार्फत आदिवासी, दुर्बल घटकांतील महिला सबलीकरणाचे कार्य त्या करीत आहेत. त्यांना या आधीही विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indira gandhi sadhbhavna award to hemlata bidkar