महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना ३१ जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप राज्याच्या शिक्षण मंडळाने शेवटचा एक दिवस उरलेला असतानाही अद्याप निकालाबाबत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करुन उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने अखेर जाहीर केला आहे. मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षांतील कामगिरी ग्राह्य़ धरण्यात येणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यमंडळाला अवघ्या २८ दिवसांत निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली होती.

CBSE 12th Class Results : आज दुपारी २ वाजता लागणार निकाल; जाणून घ्या कसा आणि कुठे पाहायचा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने दिलेली वेळेची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण मंडळ बारावी निकाल २०२१ ची आज घोषणा केल्यास उद्या निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

यावर्षी महाराष्ट्र एचएससी परीक्षा २०२१ साठी साधारण १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर जाहीर होणार आहे.

निकालाचे सूत्र काय?

बारावीचा निकाल जाहीर करताना ३०+३०+४० असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांतील गुणांच्या आधारे ३० टक्के गुण देण्यात येतील. अकरावीच्या अंतिम परीक्षेच्या आधारे ३० टक्के गुण देण्यात येतील. तर बारावीच्या वर्षांत शाळांनी घेतलेल्या चाचण्या, सराव परीक्षा, सत्र परीक्षा, प्रात्यक्षिक यांच्याआधारे ४० टक्के गुण देण्यात येणार आहेत.

पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थ्यांचा निकाल कसा?

पुनर्परीक्षार्थी आणि बाहेरून परीक्षा देणारे (१७ क्रमांकाचा अर्ज भरणारे) विद्यार्थी यांचा निकाल दहावी आणि बारावी या दोनच वर्षांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार दहावीतील गुणांना ५० टक्के आणि बारावीतील गुणांसाठी ५० टक्के असा भारांश निश्चित करण्यात आला आहे. पुनर्परीक्षार्थीचे यापूर्वी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विषय ग्राह्य़ धरण्यात येतील. पुनर्परीक्षार्थी यापूर्वीच्या परीक्षेत एकाही विषयांत उत्तीर्ण नसल्यास आणि खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या वर्षांतील स्वाध्याय, चाचण्या यांआधारे मूल्यांकन केले जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra hsc result 2021 when is the result of 12th standard date is likely to be announced by the board of education today abn