रवी काशीकर यांचा खुलासा
दिवंगत शरद जोशी यांनी शेतकरी सॉल्व्हंटच्या नव्हे, तर ‘शिवार’च्या भागधारक शेतकऱ्यांचे पैसे परत केले आहे, असा खुलासा जोशींचे विश्वासू रवी काशीकर यांनी आज केला.
शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांचे १२ डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या स्मृतीनिमित्य पवनारला २४ डिसेंबरला झालेल्या प्रार्थनासभेत जोशी यांच्या मालमत्तेबाबत रवी काशीकर यांनी काही माहिती दिली होती.
या अनुषंगाने सविस्तर वृत्त आज लोकसत्तात प्रकाशित झाल्यावर संघटनाप्रेमींनी मृत्यूपश्चातही शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखविणाऱ्या जोशींबद्दल भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यासंदर्भात एक खुलासा व्यक्त करताना रवी काशीकर म्हणाले, जोशी साहेबांनी २५ लाख रुपये भागधारक शेतकऱ्यांना परत केले, हे खरे आहे, पण हे भागधारक शेतकरी सॉल्व्हंटचे नव्हते. अनवधानाने ही माहिती दिली गेली असावी.
त्यांनीच स्थापन केलेल्या शिवार संस्थेच्या शेतकऱ्यांना हे पैसे परत करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी त्यांचे उत्पादन मध्यस्थ न ठेवता स्वत: विक्रीस आणावे, अशी कल्पना ‘शिवार’ मागे होती, पण शिवार बुडाली म्हणून यात गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी स्वत:च्या पैशातून परत केले आहेत. यानिमित्याने जोशी यांचा शेतकऱ्यांशी असलेल्या नात्याचा एक भावनिक पैलू पुढे आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money given back to those farmers