२२ महिन्यांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्य़ातील सिल्लोड शहरात मुकुंद अन्वीकर यांनी सौरऊर्जेवर पेट्रोलपंप चालविण्याचा प्रयोग हाती घेतला आणि आता राज्यात सौरऊर्जेवर बारापेक्षा अधिक पेट्रोलपंप सुरू झाले आहेत. यातील तीन पंप औरंगाबाद जिल्ह्य़ातील आहेत. विशेष म्हणजे सौरऊर्जेबाबतचे धोरण अजूनही ठरलेले नाही. सौरऊर्जेच्या अनुषंगाने केलेल्या अशा छोटय़ा-छोटय़ा प्रयोगांमुळे अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात गती येण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, सौरऊर्जेसाठी दिले जाणारे अनुदान १५ महिने उशिरा मिळत असल्याने अशा उपक्रमांना सरकारकडून बळ मिळते की त्यांचे अडथळेच होतात, असा प्रश्न विचारला जात आहे.
सिल्लोड शहरात साधारणत: साडेसात ते आठ तास भारनियमन असते. या काळात पेट्रोलपंप चालवायचा कसा, असा प्रश्न अन्वीकर यांना सतावत होता. त्यांचे एक नातेवाईक ऊर्जा क्षेत्रात काम करीत. त्यांनी सौरऊर्जेचा पर्याय सांगितला. अन्वीकर यांच्या पेट्रोलपंपास दररोज २८ ते ३० युनिट वीज लागते. त्याचा प्रतियुनिट दर १२ ते १३ रुपये आहे. भारनियमनामुळे जनरेटर सुरू केल्यास लागणारा डिझेलचा खर्च प्रतिदिन ५०० रुपये असे. त्यामुळे वर्षांचे १ लाख ८० हजार रुपये भारनियमनाच्या नावे खर्च होत. इंधन विक्री करणाऱ्या अन्वीकरांना ऊर्जेची बचत करायची होती. म्हणून त्यांनी सौरऊर्जा पेट्रोलपंपावर सुरू करता येऊ शकते काय, याची चाचपणी सुरू केली. इंडियन ऑइल कंपनीला त्यांनी या संदर्भात विचारणा केली. त्यांनीही प्रयोग म्हणून हा प्रकल्प हाती घेतला. आज अन्वीकर यांच्या पेट्रोलपंपावरील चार पंप सौरऊर्जेवर चालतात. तीन किलोवॅट सौरऊर्जेसाठी पेट्रोलपंपाच्या छतावर १२ सौरपटल बसविण्यात आले. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी झाले आहे. भारनियमन असले तरी पंप चालू राहतो, हा संदेश ग्राहकांपर्यंत गेल्याने त्याचा वेगळा फायदा अन्वीकर यांना झाला.
मराठवाडय़ात वर्षांतले जवळपास ३३० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. सूर्याच्या किरणांचा कोनदेखील सौरऊर्जेस पोषक असल्याचे अहवाल अमेरिकेतील ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेनेही दिले आहेत. त्या आधारेच मराठवाडय़ात सौरऊर्जेचे प्रकल्प सुरू करण्यास अनेक उद्योजकांनी सरकारदरबारी प्रस्ताव सादर केले. तथापि, धोरण न ठरल्याने ते पडून आहेत. उस्मानाबाद जिल्ह्य़ात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने एक मेगावॅटचा प्रकल्प सुरू केला. लातूरला खासगी उद्योजकाने हाती घेतलेल्या पाच मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. उस्मानाबाद व हिंगोली या दोन जिल्ह्य़ांत राज्य सरकारमार्फतही सौरऊर्जेचे मोठे प्रकल्प हाती घेण्याचे धोरण आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात त्यासाठी भूसंपादनही करण्यात आले. पण मोठे प्रकल्प रेंगाळत राहतात. छोटय़ा-छोटय़ा प्रकल्पातून नवनवीन संकल्पना पुढे येत आहेत. पेट्रोलपंप आणि मोबाइल टॉवर या क्षेत्रातही सौरऊर्जा वापरण्याचा कल अलीकडे वाढला आहे. आन्वीकर यांनी सांगितले की, सौरऊर्जेसाठी आरंभी मोठी गुंतवणूक करावी लागते. ३० किलोव्ॉटचा हा प्रकल्प उभारण्यास ६ लाख रुपये गुंतवावे लागले. ही रक्कम दोन वर्षांत तशी वसूल झालीच म्हणावे लागेल. अलीकडे असे प्रयोग वाढले असून त्याला सरकारने प्रोत्साहन द्यायला हवे. मात्र, सरकारकडून मिळणारी सवलत वेळेवर मिळत नाही.
सर्वसामान्यांमध्ये विज्ञान आणि ऊर्जेसंबंधात जनजागृती व्हावी, म्हणून काम करणाऱ्या श्याम दंडे यांनी सौर प्रकल्प सुरू करणाऱ्या व्यक्तींच्या प्रयोगापर माहितीचे संकलन सुरू केले आहे. या अनुषंगाने २६ ते २८ एप्रिलदरम्यान त्यांनी एका प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2013 रोजी प्रकाशित
भारनियमनाला उतारा : सौरऊर्जेवर पेट्रोल पंप!
२२ महिन्यांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्य़ातील सिल्लोड शहरात मुकुंद अन्वीकर यांनी सौरऊर्जेवर पेट्रोलपंप चालविण्याचा प्रयोग हाती घेतला आणि आता राज्यात सौरऊर्जेवर बारापेक्षा अधिक पेट्रोलपंप सुरू झाले आहेत. यातील तीन पंप औरंगाबाद जिल्ह्य़ातील आहेत. विशेष म्हणजे सौरऊर्जेबाबतचे धोरण अजूनही ठरलेले नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-04-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol pump on solar energy excerpt to power cut